Join us  

'सत्तासंघर्षात आमदार म्हणून कर्तव्य बजावलं पण बाप म्हणून मुलांना वेळ देऊ शकत नसल्याची खंत'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 11:07 AM

शनिवारी विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत यशस्वी झाले तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकही बिनविरोध पार पडली.

मुंबई - गेल्या महिनाभरापासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने सरकार स्थापन करण्यात यश मिळविलं आहे. मात्र या संपूर्ण कालावधीत कोणताही आमदार फुटू नये यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी विशेष काळजी घेतली. मागील महिनाभर या आमदारांचा मुक्काम वेगवेगळ्या हॉटेलमध्ये होता.

शनिवारी विधानसभेत उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणीत यशस्वी झाले तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकही बिनविरोध पार पडली. त्यामुळे सत्ताधारी आमदारांचा हॉटेल मुक्काम संपला आहे. त्यामुळे या आमदारांना कुटुंबाची तसेच मतदारसंघाची ओढ लागली आहे. रविवारी विशेष अधिवेशन संपल्यानंतर अनेक तरुण आमदार आपापल्या घराकडे निघाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि काँग्रेसचे विश्वजित कदम एकत्र पुण्याच्या दिशेने प्रवास करत होते. 

या प्रवासादरम्यान घडलेला किस्सा रोहित पवारांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. रोहित पवार म्हणतात की, गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवादिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.

कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनतं आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होतं, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही अशी खंत रोहित पवारांनी बोलून दाखविली. 

तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :रोहित पवारविश्वजीत कदमराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना