आ. मैथिली ठाकूर म्हणते, मी उत्तर भारतीय मराठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:41 IST2026-01-13T11:41:12+5:302026-01-13T11:41:34+5:30
दहिसर येथील प्रचारात मी उत्तर भारतीय मराठी असल्याचे सांगत आणि मराठीत गाणे म्हणत त्यांनी भाषिक वादावर भाष्य केले

आ. मैथिली ठाकूर म्हणते, मी उत्तर भारतीय मराठी
मुंबई : उत्तर भारतीयांची मतदार असलेल्या संख्या अधिक प्रभागांमध्ये भाजपने आपले उत्तर भारतीय स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत. प्रसिद्ध उत्तर भारतीय लोकगायिका आणि भाजपच्या स्टार प्रचारक आ. मैथिली ठाकूर यांनीही लक्ष वेधून घेतले आहे. दहिसर येथील प्रचारात मी उत्तर भारतीय मराठी असल्याचे सांगत आणि मराठीत गाणे म्हणत त्यांनी भाषिक वादावर भाष्य केले आहे.
कांदिवली पूर्व येथे एका उमेदवारासाठी भाजप खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी आले होते. त्याचप्रमाणे भाजप स्टार प्रचारक आ. ठाकूर मुंबईत दाखल झाल्या.
रोड शो करत केला प्रचार
रविवारी विविध प्रभागातील भाजप प्रचार केला. दहिसर परिसरातील प्रभाग १ मध्ये त्यांनी रोड शोद्वारे प्रचाराची सुरुवात केली. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र असे विभाग करून चालणार नाही. आपल्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जावे लागेल हाच संदेश मी घेऊन आली आहे, असे त्या म्हणाल्या.
निवडणुकीतील मराठी आणि उत्तर भारतीय मुद्द्यांवर बोलताना, 'अरे भाऊ, असे वेगळे का पाहता? मीही उत्तर भारतीय मराठीच आहे,' असे सांगत त्यांनी मराठीत गाणे म्हटले.
मुंबई हे आपले दुसरे घर असल्याचे नमूद केले. लोकांना बदल हवा आहे आणि भाजपचा महापौर निवडून येईल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.