Join us

आमदार कालिदास कोळंबकर भाजपाच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 06:42 IST

वडाळा मतदारसंघातील कॉँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच भाजपाच्या तंबूत शिरण्याचे संकेत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक असलेले कोळंबकर हे त्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबई  - वडाळा मतदारसंघातील कॉँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हे लवकरच भाजपाच्या तंबूत शिरण्याचे संकेत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक असलेले कोळंबकर हे त्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोळंबकर यांच्या मतदारसंघात बीडीडी चाळीच्या पुनर्वसन कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या वेळी कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव करीत त्यांचा चाहता असल्याचे वक्तव्य केले. मूळचे शिवसैनिक असलेले कालिदास कोळंबकर यांनी नारायण राणे यांच्यासह सेनेला ‘जय महाराष्टÑ’ केला होता. त्यानंतर कॉँग्रेस पक्षातून सलग तीनदा ते निवडून आले आहेत. मतदारसंघात ठिकठिकाणी लावलेल्या पोस्टरवर कॉँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. त्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘काँग्रेसमधील लोकांनी माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला. काँग्रेसच्या फलकांवरून माझा फोटो काढण्यात आला. मग माझ्या बॅनरवर मी त्यांचे फोटो का लावू? माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लागणे महत्त्वाचे आहे. माझे काम जो करणार तो महत्त्वाचा असेल. शेवटी जनतेला काम हवे आहे आणि नायगावच्या जनतेने यासाठीच विश्वासाने मला मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.कोणत्या पक्षात जाणार, या प्रश्नावर ते म्हणाले, मी पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचा चाहता आहे. ते विरोधी पक्षाचे नेते असतानाही मी त्यांचा मित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मला कालिदास जुन्या वाटेवर परत या, असे सांगितल्याचा दावा करीत त्यांनी नेमकी भूमिका स्पष्ट केलेली नाही.

टॅग्स :कालीदास कोळंबकरभाजपा