Join us

आमदार अपात्रता : ७ दिवसांत काय केले? आज काेर्टाला सांगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 07:00 IST

आमदार अपात्रता : वेळापत्रकही देणार

मनोज मोघे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या सुनावणीची रूपरेषा, वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पुढील सुनावणीचे वेळापत्रक तसेच सोमवारी झालेल्या सुनावणीचा तपशील तयार केला आहे. ही सर्व कागदपत्रे महान्याय अभिवक्ता (सॉलिसीटर जनरल) तुषार मेहता यांच्याकडून बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली. या वेळापत्रकानुसार संपूर्ण तपशीलवार सुनावणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून जानेवारीत अपात्रतेचा अंतिम निकाल होण्याची शक्यता आहे.

आमदार अपात्रतेच्या सुनावणीत होत असलेल्या विलंबाबाबत ३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  न्यायालयाने मागील सुनावणीत आठवडाभरात तपशील देण्यास सांगितले होते. त्यानुसार संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर करणार आहेत. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार असून आतापर्यंतच्या सुनावणीचा तपशील न्यायालयास देण्यात येईल, असे ॲड. राहुल  नार्वेकर म्हणाले.

ठाकरे गटाकडून नवनवीन याचिका  ठाकरे गटाकडून सातत्याने नवनवीन मागणी केली जात आहे. पहिल्यांदा याचिका एकत्र करण्याची मागणी केली. त्यानंतर पूरक कागदपत्रे सादर करण्याची मागणी केली. सुनावणी काळातच केलेल्या मागण्यांनुसार पुन्हा कागदपत्रांची छाननी, तसेच अन्य बाबींमुळे सुनावणीवर परिणाम होते, असे विधिमंडळातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :शिवसेनाराहुल नार्वेकर