मिठी नदीच्या गाळसफाईचे घोंगडे यंदा महापालिकेच्या गळ्यात? निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:16 IST2026-03-19T13:13:08+5:302026-03-19T13:16:09+5:30

२४ मार्चपर्यंत मुदतवाढ; प्रशासनाकडूनही कामासाठी चाचपणी 

Mithi River siltation cleaning task falls on Municipal Corporation this year? Zero response to tender process | मिठी नदीच्या गाळसफाईचे घोंगडे यंदा महापालिकेच्या गळ्यात? निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद

मिठी नदीच्या गाळसफाईचे घोंगडे यंदा महापालिकेच्या गळ्यात? निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद

मुंबई : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाच्या कंत्राटासाठी १७ मार्चपर्यंत दिलेल्या मुदतीत एकही कंत्राटदार पुढे आलेला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा २४ मार्चपर्यंत निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीची सफाई होणे आवश्यक असताना, कंत्राटदारांनी स्वारस्य न दाखवल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे, तर दुसरीकडे विभाग स्तरावर पालिका यंत्रणेकडूनच गाळ काढता येईल का, याची चाचपणी प्रशासन करत आहे. त्याकरिता अधिकाऱ्यांच्या बैठकाही सुरू आहेत. 

पावसाळ्यात पाणी साचून मुंबई ठप्प होऊ नये, यासाठी लहान - मोठे नाले आणि मिठी नदीच्या सफाईसाठी पालिकेने दोन वर्षांचे कंत्राट दिले होते. मात्र, ‘मिठी’ सफाईच्या कामातील घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी चौकशी सुरू असून, काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या कारणास्तव दोन वर्षांचे कंत्राट देऊनही यंदा वेळेत सफाई सुरू झालेली नाही. 

‘मिठी’च्या सफाईसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवूनही आता दुसऱ्यांदा निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे. निविदा प्रक्रियेतील अटी, शर्तीही प्रशासनाने त्यासाठी शिथिल केल्या. 

महापाैरांनी दिले होते आदेश
पालिकेने कंत्राटदार न मिळाल्यास स्वतःच्या विभागाकडून सफाईची तयारी ठेवावी, असे निर्देश महापौरांनी गेल्या आठवड्यात आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार प्रशासनाने सफाईसाठी चाचपणी सुरू केली आहे. मात्र, निविदेला मुदतवाढ  मिळाल्याने याचा अंतिम निर्णय २४ मार्चनंतरच होईल, अशी शक्यता आहे.  

नालेसफाईसाठी झोननिहाय ठेकेदारांची नियुक्ती अद्याप प्रलंबित 
मुंबईतील नाल्यांची सफाई मोठे नाले, लहान नाले आणि मिठी नदी, अशा तीन टप्प्यांत होते. लहान नाल्यांसाठी मागील वर्षी नियुक्त केलेल्या २४ पैकी २१ कंत्राटदारांनी यंदाची नालेसफाई सुरू करणे अपेक्षित आहे. 
काही भागांत नालेसफाई सुरू झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मोठ्या नाल्यांकरिता 
सहा झोनसाठी एक याप्रमाणे सहापैकी तीन कंत्राटदारांनी यंदा काम सुरू करणे अपेक्षित आहे. 
एकूणच छोट्या नाल्यांसाठी तीन आणि मोठ्या नाल्यांसाठी तीन झोनमध्ये, तर मिठी नदीसाठी 
तीन, याप्रमाणे कंत्रादारांची नियुक्ती अद्याप होणे 
बाकी आहे. 

‘२००५ सालाप्रमाणे पूरपरिस्थितीची भीती’
मिठी नदी साफसफाईच्या कामाला 
होत असलेल्या विलंबामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील अनेक भाग पाण्याखाली जाण्याची भीती नगरसेवकांनी स्थायी समितीच्या चर्चेत व्यक्त केली आहे. प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास २००५ सारखी पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला. 
दरम्यान स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रशासनाला पुढील बैठकीत या विषयावर सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. शहरात पाणी साचल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशारा नगरसेवकांनी दिला.

...या परिसरासाठी निविदा प्रक्रिया   
मागील वर्षी मिठी नदीसाठी नियुक्त कंत्राटदाराचा फटका इतर काही वॉर्डांना बसला होता. त्यामुळे एम पूर्व, एम पश्चिम, एच पश्चिम आणि एस विभागांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यात गोवंडी, देवनार, मानखुर्द, शिवाजीनगर, चेंबूर, वांद्रे, खार, सांताक्रूझ, घाटकोपर, चांदिवली या परिसरांचा समावेश होतो.

Web Title : मीठी नदी की सफाई रुकी; मुंबई पर मानसून में बाढ़ का खतरा।

Web Summary : मीठी नदी से गाद निकालने में देरी, कोई ठेकेदार बोली लगाने को तैयार नहीं। नगर पालिका को बाढ़ का डर। अधिकारी आंतरिक सफाई की संभावना तलाश रहे हैं। शहर पर 2005 जैसी बाढ़ का खतरा।

Web Title : Mithi River cleanup stalls; Mumbai faces monsoon flood risk.

Web Summary : Mithi River desilting faces delays as no contractors bid. The municipality fears floods. Officials explore internal cleanup. The city risks a 2005-like flood situation.