बँक खातेदाराच्या क्रेडिट कार्डचा नऊ महिने गैरवापर; दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:43 IST2025-12-24T12:42:39+5:302025-12-24T12:43:00+5:30
जैन यांच्या म्हणण्यानुसार, नऊ महिन्यांपासून त्यांनी स्वतः क्रेडिट कार्डचा वापर केलेला नाही. तरीही त्यांच्या कार्ड खात्यावर सुमारे १ लाख २० हजार रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली.

बँक खातेदाराच्या क्रेडिट कार्डचा नऊ महिने गैरवापर; दोघांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँक खातेदाराच्या क्रेडिट कार्डचा नऊ महिने गैरवापर करत ऑनलाइन व्यवहारांद्वारे १ लाख २० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार वांद्रे पश्चिमेत घडला. हर्ष जैन (२८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी रिकव्हरी एजंटसह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास सुरू आहे.
जैन यांच्या म्हणण्यानुसार, नऊ महिन्यांपासून त्यांनी स्वतः क्रेडिट कार्डचा वापर केलेला नाही. तरीही त्यांच्या कार्ड खात्यावर सुमारे १ लाख
२० हजार रुपयांची थकबाकी दाखविण्यात आली.
या संदर्भात त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरशी ई-मेलद्वारे अनेकदा संपर्क साधला; मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संबंधित एजंटांनी केवळ जैन यांनाच नव्हे, तर त्यांच्या मित्रमंडळी व कुटुंबीयांनाही सतत फोन करून त्रास दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. बँकेकडून आलेल्या रिकव्हरी कॉलनंतरच आपले क्रेडिट कार्ड अज्ञात व्यक्तीने परवानगीशिवाय वापरल्याचे लक्षात आल्याचे जैन यांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
लेडीज टेलरचीही फसवणूक...
वांद्रे पश्चिमेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुजाहिद शेख (५४) या लेडीज टेलरच्या क्रेडिट कार्डचादेखील अशाच प्रकारे गैरवापर झाला असून तीन व्यवहारांत १ लाख ५४८ रुपयांचा अपहार केल्याचे शेख यांनी सांगितले. वांद्रे पोलिसांनी २२ डिसेंबरला अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंदवला.