यदु जोशी
मुंबई : महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली आहे. आता पाच वर्षे राज्याला गतिमान सरकार देणे, विविध क्षेत्रांत महाराष्ट्र क्रमांक एकवर आणणे आणि दुष्काळमुक्त राज्याची उभारणी हेच माझे लक्ष्य असेल. मी बदल्याचे राजकारण करणार नाही, अशी ग्वाही मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.
मुख्यमंत्री म्हणून आपले व्हिजन, मिशन काय असेल हे स्पष्ट करतानाच फडणवीस यांनी आजचे महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले असल्याची खंत व्यक्त केली आणि राजकारणाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे नमूद केले. गेल्या अडीच तीन वर्षांत अनेक बरेवाईट अनुभव आले, पातळी सोडून झालेली टीकाही सहन करावी लागली पण आता राज्याचा प्रमुख म्हणून काम करताना ते विसरत काम करण्याचीच माझी भावना असेल, असे ते म्हणाले.
प्रश्न : आपण २०२२ मध्ये सत्तांतर झाले, तेव्हा विधानसभेत आपण म्हणाले होते, आपल्यावर टोकाची टीका केली, आपली बदनामी केली होती. त्यांचा आपण बदला घेणार... त्यांना माफ केले हाच आपला बदला, आता यावेळीही आपली भरपूर बदनामी केली गेली, आता आपली प्रतिक्रिया काय आहे?
उत्तर : मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे, त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला. मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. एक सांगू! महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर सडेतोड उत्तर दिले आहे.
प्रश्न : यावेळी विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या विधानसभेत फारच कमी आहे. बहुमतातील सरकार विरोधकांचा आवाज दाबेल असा आरोप होत आहे, आपले मत?
उत्तर : आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष अजिबात करणार नाही. संख्येने कमी असले तरी तेदेखील लोकप्रतिनिधी आहेत. त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी त्यांना दिली जाईल. आघाडी, महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला, आम्ही त्याविरोधात संघर्ष केला, आता आम्ही सत्तेत आल्यानंतर त्याचा आवाज दाबायचा हे मला मान्य नाही.
प्रश्न : राज्याला आर्थिक शिस्तीची गरज आहे असे आपल्याला वाटत नाही का? नेमके काय करायला हवे आहे?
उत्तर : राज्याला आर्थिक शिस्तीची नक्कीच गरज आहे. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आणि अल्पकालीन उपाययोजना अशा दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागेल. आर्थिक शिस्त म्हणजे लोकाभिमुख योजनांना कात्री लावणे, असा अर्थ होत नाही. त्या सुरू ठेवण्याबरोबरच राज्याचे उत्पन्न वाढणे, औद्योगिक गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांत राज्य अव्वल स्थानी ठेवणे हे महत्त्वाचे आहे. खर्च, उत्पन्नाचे अचूक भान ठेवत आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे.
प्रश्न : आपण २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालात तेव्हा जलयुक्त शिवार, सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे विहित वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत यासाठीचा सेवा हमी कायदा यावर आपला फोकस होता. यावेळी आपले सर्वोच्च प्राधान्य कशाला असेल?
उत्तर : मी मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना, राबविलेले कार्यक्रम पुढे नेतानाच महायुती सरकारच्या लोकाभिमुख योजनांना गती देण्यावर माझा भर असेलच. मुख्यमंत्री म्हणून माझे मिशन हे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे असेल. विविध समाजांसाठी महामंडळे आम्ही आचारसंहितेपूर्वी जाहीर केली होती, आता त्यांची उभारणी आणि त्यांच्या माध्यमातून विविध समाजघटकांना न्याय हे लक्ष्य असेलच.
प्रश्न : दुष्काळमुक्त महाराष्ट्राची आपली संकल्पना नेमकी कशी आहे?
उत्तर : वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड हा ८७ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली आणली जाईल. मराठवाड्यात १३ हजार कोटी रुपये खर्चाच्या सात सिंचन प्रकल्पांची उभारणी, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविणार, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड हा साडेतेरा हजार कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारणे, नार-पार-गिरणा नदीजोड या ७ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उभारणी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड या २,२१३ कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पाची उभारणी, पश्चिम महाराष्ट्रातील २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पांची उभारणी हे पुढील काळातील मिशन असेल. शेती, उद्योगांना पाणी व पिण्याचे मुबलक पाणी याद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे.
प्रश्न : निवडणूक प्रचारकाळात आपण अनेक आश्वासने दिली, त्यांची पूर्तता करणार का?
उत्तर : दिलेली आश्वासने पूर्ण करणे याला माझे प्राधान्य असेल. तीन पक्षांची समिती त्यासाठी असेल आणि आश्वासनांच्या पूर्ततेचा सातत्याने आढावा घेतला जाईल, असे आम्ही आधीच जाहीर केले आहे.
प्रश्न : गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर पार घसरला. एकमेकांवर इतके खालच्या पातळीचे आरोप कधीही झाले नव्हते. एक संवेदनशील राजकारणी म्हणून आपण याकडे कसे पाहता आणि हे सगळे बदलायला हवे, असे आपल्याला वाटत नाही का?
उत्तर : महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय वैभवशाली परंपरा आहे. तिची पुनर्स्थापना झालीच पाहिजे असे माझे मत आहे आणि त्यासाठी पुढील काळात मी नक्कीच पुढाकार घेईन. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे, जे घेणार नाहीत त्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल.