Join us  

मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:32 AM

मुख्यमंत्री ठाकरे यांची घोषणा; आरोग्य सुविधा बळकट करणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे सांगितले. कोविड केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल आणि मिशन ऑक्सिजन स्वावलंबन राबविले जाईल, असे त्यांनी जाहीर केले. 

पेटीएम फाउंडेशनच्या वतीने राज्यात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याआनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोरोनाची तिसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजननिर्मिती १५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.  मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ऑक्सिजनच्या  स्वयंपूर्णतेसाठी ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ राबविण्यासाठी म्हणून विविध प्रयत्न केले जात आहेत. पेटीएम फाउंडेशनचे विजय शेखर शर्मा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून कोरोना संदर्भात सुरू असलेले प्रयत्न देशासाठी मार्गदर्शक असल्याचा उल्लेख केला.

जीव वाचले तरच विकासाला अर्थविकास होत राहील. पण जीव वाचले, तरच विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरू केली आहे. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

टॅग्स :उद्धव ठाकरेऑक्सिजनकोरोना वायरस बातम्या