मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड
By दीपक भातुसे | Updated: January 19, 2026 10:32 IST2026-01-19T10:32:36+5:302026-01-19T10:32:53+5:30
भाजप मुंबईत दीर्घकालीन राजकीय पकड मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

मुंबईत ‘शतप्रतिशत’च्या दिशेने भाजपची दमदार दौड
दीपक भातुसे
शतप्रतिशत नारा देणाऱ्या भाजपला आतापर्यंत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करता आली नव्हती. सत्तेत भाजप कायम शिवसेनेबरोबर दुय्यम भागीदार राहिला होता. हे शल्य भाजपच्या मनात होतेच. त्यातूनच यावेळी सत्ता काबीज करण्याचे पक्षाने ठरवले होते. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या, त्यात यंदा ७ जागांची वाढ झाली आहे. मात्र, भाजपसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईत त्यांचा महापौर बसणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल केवळ मुंबईच्या राजकारणावर परिणाम करणार नाही तर राज्याच्या राजकारणाची दिशाही ठरवणारा असेल.
मुंबईचे राजकारण ठाकरेकेंद्रित असायचे. ते यापुढे भाजपकेंद्रित असेल. केंद्र, राज्य आणि आता महापालिका या तीनही सत्ताकेंद्रांवर वर्चस्व मिळवल्याने भाजप मुंबईत दीर्घकालीन राजकीय पकड मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करेल. मुंबईतील सत्तेनंतर विधानसभा निवडणुकीत आपल्या जागा आणखी वाढवून मुंबईत ‘शतप्रतिशत’ भाजप करण्याच्या दिशेने पक्षाचे प्रयत्न असतील.
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. २०२४ च्या निवडणुकीत शिंदेसेनेबरोबरच्या युतीत भाजपचे १५ आमदार निवडून आले आहेत. भाजप आता मुंबईत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या दृष्टीने तयारीला लागेल. तीनही स्तरावर सत्ता असल्याने आगामी विधानसभेत मुंबईतील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप फोडाफोडीचे राजकारण करू शकतो.
उद्धवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई होती. या लढाईत त्यांना अडीच दशकांची सत्ता टिकवता आली नाही. मात्र बलाढ्य भाजपशी आणि त्यांच्या सगळ्या यंत्रणांशी लढा देऊन उद्धवसेनेने जिंकलेल्या ६५ जागा त्यांना लढण्यासाठी ताकद देतील. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढूनही फारसा फायदा झाला नसल्याने भविष्यात या युतीचे काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
जेमतेम २९ जागांची मजल मारता आलेल्या शिंदेसेनेसमोर मुंबईत टिकून राहण्याचे आव्हान आहे. भाजपबरोबर त्यांना सत्तेत सहभाग मिळेल एवढाच काय तो दिलासा. मात्र सत्ता राबवताना भाजपकडून मित्रपक्षांना मिळणाऱ्या वागणुकीची पुनरावृत्ती होण्याचीच शक्यता अधिक. त्यामुळे शिंदेसेनेला सत्तेचा फारसा लाभ उठवता येणार नाही. मुंबईत शिंदेसेनेचे ६ आमदार आहेत. भाजपच्या आक्रमक राजकारणापुढे मुंबईतील ताकद वाढवण्यासाठी त्यांना झगडावे लागणार आहे.
मनसेमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून वंचितबरोबर युतीत निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत २४ जागा मिळाल्या. मागील निवडणुकीतील ३१ संख्याबळ राखता आले नाही. त्यामुळे काँग्रेसची ताकद मर्यादितच आहे. हा पक्ष महाविकास आघाडीतून लढला असता तर त्याचा फायदा काँग्रेसला आणि उद्धवसेनेलाही झाला असता. कारण जवळपास ३० जागांवर उद्धवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांची मते ही जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून मुंबईतील मुस्लीम मतदार दुरावल्याचे या निवडणुकीत दिसून आले. मुस्लीम उमेदवारांनी एमआयएमला साथ दिल्याने त्यांचे ८ नगरसेवक यावेळी मुंबईत जिंकून आले आहेत. काँग्रेसला याबाबत चिंतन करावे लागणार आहे.
दोन्ही राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नव्हतीच. यावेळी ती आणखी कमी झाली. राष्ट्रवादीने कधीच मुंबईकडे गांभीर्याने बघितले नाही. मनसेचीही तीच अवस्था आहे. राज ठाकरे यांच्यासारखा गर्दी खेचणारा नेता मुंबईत आपला पक्ष वाढवू शकला नाही याचे चिंतन त्यांच्याकडे होईलच.