७,५२२ अवयवदात्यांची प्रतिज्ञा; २४५ रुग्णांना नवजीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:27 IST2025-08-13T10:27:12+5:302025-08-13T10:27:12+5:30
आज आंतरराष्ट्रीय अवयवदानदिनी 'लोकमत जीवनदान मोहिमे'ची सांगता

७,५२२ अवयवदात्यांची प्रतिज्ञा; २४५ रुग्णांना नवजीवन
मुंबई : अवयवदानासारखे महादान दुसरे नाही, ही भूमिका घेऊन लोकमतने 'मिशन जीवनदान' ही जनजागृती मोहीम हाती घेतली. 'लोकमत' एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या मोहिमेत ७,५२२ दात्यांनी अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरून 'लोकमत'कडे दिले.
त्याशिवाय 'लोकमत' समूहाने महाराष्ट्रभर राबविलेल्या जनजागृती मोहिमेमुळे अवयवदानाचे प्रतिज्ञा अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक पुढे आले. विशेष म्हणजे राज्यभरात या वर्षांत नातेवाइकांनी आपल्या मेंदुमृत रुग्णांच्या नातेवाइकांचे अवयवदान केल्याने २४५ रुग्णांना नवजीवन मिळाले. आज जगभर साजरा होत असलेल्या आंतरराष्ट्रीय अवयवदानदिनी 'लोकमत'ने सुरू केलेल्या या मोहिमेची सांगता होत आहे
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहेत. त्यामुळे अवयव निकामी झालेले रुग्ण प्रत्यारोपणासाठी रुग्णालयात नोंद करून ठेवत आहेत. गेल्या काही वर्षांत अवयवदानविषयक जनजागृतीसाठी प्रयत्न होत असले तरी ही मोहीम अजूनही संथ गतीनेच सुरू आहे. तिला गती आणि बळ मिळावे यासाठी 'लोकमत' समूहाने १४ मेपासून 'मिशन जीवनदान' ही मोहीम राज्यभर राबविण्यास सुरुवात केली.
या मोहिमेत मुंबई, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर, नांदेड, नागपूर, जळगाव, अकोला, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे तसेच गोवा, दिल्ली, गाझियाबादमधूनही लोकांनी प्रतिज्ञा फॉर्म भरले. लोकमतच्या चमूने मोहिमेचा राज्यभर प्रसार-प्रचार केला. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांच्या माध्यमातून महत्त्व समजावून सांगितले. याचा परिणाम या मोहिमेविषयी व्यापक जागृती होण्यात झाला.
'लोकमत'ने ही मोहीम सुरू केली, त्यावेळी राज्यातील अवयव प्रत्यारोपण नियमनाचे काम पाहणाऱ्या 'सोटो' (राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था) या संस्थेने या उपक्रमाचे कौतुक केले होते. संस्थेने त्यांच्या सामाजिक माध्यमांवरून या उपक्रमाची माहितीही प्रसारित केली. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत ८९ मॅदुमृत दात्यांचे अवयव दान झाले असून, त्याद्वारे २४५ रुग्णांना अवयव मिळाले.
'मिशन जीवनदान' उपक्रमात राज्यातील अनेक महाविद्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी, खासगी संस्था व ज्येष्ठ नागरिक संघांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली, ज्यामुळे जनजागृतीला अधिक बळ मिळाले.
बाबतीत समाजात मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. 'लोकमत'चा 'मिशन जीवनदान' हा उपक्रम या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. रक्तदानासारखेच अवयवदानालाही एक चळवळ म्हणून पुढे आणले पाहिजे. 'लोकमत'ने कोविड काळात रक्तदानाची मोहीम हातात घेऊन ६५ हजार बाटल्या रक्त गोळा करून दिले होते. याही वेळी अवयवदान मोहीम हाती घेऊन 'लोकमत'ने ही एक लोकचळवळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमांची राज्याला गरज आहे. त्यामुळेच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेही आम्ही राज्यभर विशेष अवयवदान जनजागृती मोहीम राबवत आहोत - प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री
अवयवदान करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून, ती एका नवजीवनाची संधी आहे. एका मॅदुमृत व्यक्तीचे अवयवदान झाले तर आठ नागरिकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे येत अवयवदान प्रतिज्ञापत्र भरणे ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे. 'लोकमत'ने हाती घेतलेली 'अवयवदान मोहीम' ही समाजजागृतीच्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे. या उपक्रमामुळे अनेक नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यात अवयवदानाच्या प्रमाणात निश्चितच वाढ होईल, याची मला खात्री आहे. अशा प्रकारचे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक आहेत. विशेषतः अल्पावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिज्ञापत्र भरले आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. या प्रेरणादायी कार्यासाठी आणि समाजहिताच्या दृष्टिकोनातून उचललेल्या पुढाकारासाठी मी 'लोकमत' समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
आमच्याकडे अनेक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अवयवदानाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे. विशेषतः अवयवदान प्रतिज्ञा अर्ज भरून नागरिकांनी स्वतःहून पुढे येणे ही काळाची गरज बनली आहे. 'लोकमत' समूहाने सुरू केलेली 'मिशन जीवनदान' ही मोहीम अत्यंत परिणामकारक ठरली आहे. या मोहिमेच्या सुरुवातीनंतर अवयवदान प्रतिज्ञा अर्ज भरण्याचा आलेख लक्षणीयरीत्या वाढला आहे. विशेष म्हणजे, त्याच काळात प्रत्यक्षात अनेक अवयवदानाची प्रकरणे यशस्वीरीत्या पार पडली आहेत. 'लोकमत'च्या या उपक्रमामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यात आणि अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी मोठी मदत झाली आहे - डॉ. आकाश शुक्ल, संचालक, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था (सोटो)