Join us

बेपत्ता साक्षीदार गावातच असल्याचे तपासाअंती उघड, वडाळा पोलीस कोठडी मृत्यू प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 01:24 IST

अपहरण झाल्याच्या संशयावरून गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला.

मुंबई : वडाळा टी टी पोलीस कोठडीतील विजय सिंह यांच्या मृत्यू प्रकरणात साक्षीदार असलेल्या अंकित मिश्रा अचानक नॉट रिचेबल झाल्याने सिंह कुटुंबीयांनी अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अपहरण झाल्याच्या संशयावरून गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने अंकित गावी जौनपूरला मित्रांसोबत सापडला.२८ आॅक्टोबर रोजी विजय सिंह याचा मृत्यू झाला. घटनेवेळी विजयसोबत चुलत भाऊ निर्मल सिंग (२०) आणि विजयचा मित्र अंकित मिश्रा (२६) हे पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या प्रकरणी कोठडी मृत्यूची नोंद करत गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेकडे सुरू असलेली चौकशी आणि दादर येथील न्यायालयात सुरू असलेली न्यायालयीन चौकशी यासाठी निर्मल आणि अंकित यांना हजर राहावे लागत होते. या प्रकरणी दशरथ देवेंद्र आणि आफरीन यांच्यावर गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात त्याचा मित्र मिश्रा हा साक्षीदार आहे. मात्र, हा गुन्हाच मागे घेण्यासाठी आरोपी आणि त्यांचे नातेवाईक आपल्याला धमकावत असल्याचे अंकितने मृत विजयचा मोठा भाऊ विभय (३२) याला सांगितले होते, तसेच त्याने अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अदखलपात्र गुन्हेसुद्धा दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून शर्मा हा सिंह कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हता. त्यामुळे शर्माचे अपहरण झाल्याचा संशय सिंह कुटुंबीयांना आला. त्यानुसार, सिंहच्या भावाने अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करत, तांत्रिक पुराव्याआधारे शर्माचा शोध सुरू केला. त्यात, तो गावी जौनपूरला असल्याचे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. तेथे तो त्याच्या मित्रांसोबत स्वत:च्या इच्छेने गेल्याचे समजले. तो त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचेही राजे यांनी नमूद केले आहे. त्यामुळे अखेर या मिसिंग मिस्ट्रीला पूर्णविराम मिळाला.

टॅग्स :गुन्हेगारी