Join us

बीकेसीतील 'मीसिंग लिंक' आजपासून खुली; एमटीएनएल जंक्शनचा प्रवास कोंडीमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:11 IST

मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर

मुंबई : बीकेसीतील वाहतूक कोंडीतून वाहनांना सोमवारपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टरजवळील एमएमआरडीए मैदान यादरम्यान उभारण्यात आलेला २०० मीटर लांबीचा मीसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टरदरम्यान गर्दीच्या वेळी वाहनांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत होते. त्यापार्श्वभूमीवर मिठी नदीच्या किनाऱ्याला लागून मीसिंग लिंक रोडची उभारणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. हा रस्ता सुमारे २०० मीटर लांबीचा असून, १८ मीटर रुंदीचा आहे. त्यावर प्रत्येकी ३ मार्गिका आहेत. त्यातून या भागातील वाहनांना आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असून, यातून एमटीएनएल जंक्शनजवळ होणारी कोंडी टळणार आहे. तसेच या भागातून वाहनांना सिग्नल फ्री प्रवास करता येईल. त्याचबरोबर पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणाऱ्या वाहनांच्या बीकेसीतील प्रवासाच्या वेळेत जवळपास १५ मिनिटांची बचत होणार आहे.

मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर

बीकेसी भागात मेट्रो रबी मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी जागोजागी रस्ता अडविण्यात आला आहे. त्यातूनही कोंडीत भर पडते. तसेच कार्यालयीन वेळेत मोठ्या संख्येने लोक एकाचवेळी बीकेसीत दाखल होत असल्यानेही कोंडी वाढते. त्यातून १ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ८ ते १० मिनिटांचा कालावधी लागतो.

प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च

 एमएमआरडीएकडून विविध बीकेसीतील कोंडी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ४ कोटी रुपये खर्चुन हा रस्ता उभारण्यात आला आहे. आता हा रस्ता खुला होणार असल्याने बीकेसी कनेक्टरखालून आणखी एक नवा मार्ग वाहनांना उपलब्ध होणार आहे. तसेच सेबी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दिलासा मिळेल.

टॅग्स :मुंबईमेट्रो