मुंबई : इटलीतील मिलान विमानतळावर एअर इंडियाचे विमान तब्बल १८ तास लटकल्याचा फटका अनेक प्रवाशांना बसला. या विमानाला विलंब झाल्यामुळे एका पत्रकार महिलेला आपल्या बहिणीच्या लग्नाला न जाता आल्यामुळे तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. या घटनेला आता जवळपास एक महिना झाला आहे. मात्र, अद्यापही या महिलेस विमान कंपनीने आश्वस्त केलेला परतावा मिळालेला नाही.
दिल्लीस्थित शिवानी बजाज यांनी यासंदर्भात ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. इटलीहून मला ५ नोव्हेंबर रोजी दिल्लीला बहिणीच्या लग्नासाठी यायचे होते. मात्र, एअर इंडियाचे विमान तिथे १८ तास लटकले. त्या १८ तासांच्या दरम्यान कंपनीने प्रवाशांना खान-पान किंवा निवारा, अशी कोणतीही सुविधा पुरवली नाही. त्यानंतर मी दुसऱ्या विमानाचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती बुकिंग प्रणालीदेखील सदोष होती. विमानाच्या तिकीट बुकिंगवेळी मी अतिरिक्त ५० हजार रुपये भरून बिझनेस क्लासमध्ये माझे तिकीट अपग्रेड केले. यानंतर मी जेव्हा कंपनीला विचारणा केली, तेव्हा तुम्हाला तुमचा ५० हजार रुपयांचा परतावा मिळेल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता या घटनेला एक महिना होत आला, तरी कंपनीने आपल्याला परतावा दिला नाही. बजाज यांच्या या नाराजीच्या पोस्टची दखल घेत एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.