लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलिस भरती २०२४-२५ मधील १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत २ मार्च रोजी गैरप्रकार केल्याप्रकरणी सोलापूर येथील उमेदवाराविरुद्ध पवई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश शंकर राठोड (चेस्ट क्र. ८५२५) असे या उमेदवाराचे नाव असून तो मूळचा सोलापूरच्या बोरामणी परिसरात राहणारा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
टी. टी. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नितीन सोनकांबळे (वय ४१) यांनी सरकारतर्फे तक्रार दिली. त्यांची ९ फेब्रुवारीपासून मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्र, अंधेरी पूर्व येथे पोलिस भरती बंदोबस्तासाठी तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती. २ मार्च रोजी पहाटे कर्तव्यावर असताना डिटेल क्रमांक ८३ चे इन्चार्ज कृष्णा होळकर यांनी उमेदवार राठोड याने १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्याचे केवळ भासविल्याची माहिती दिली. नियमानुसार १६०० मीटरसाठी ४०० मीटर ट्रॅकचे चार फेरे पूर्ण करणे आवश्यक असते. सर्व उमेदवारांची चाचणी पूर्ण झाल्यानंतर गुणपत्रिका तपासताना राठोड याने चारऐवजी केवळ तीन फेरे पूर्ण केल्याचे आढळले.
संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासलेसर्व्हरवरील नोंदीनुसार पहिल्या फेरीस १.४०.९०० मिनिटे, दुसऱ्यास १.५४.३५० मिनिटे, तिसऱ्यास २.०८.६०० मिनिटे, तर चौथ्या फेरीस केवळ ००.००.४९.५०० सेकंद वेळ लागल्याचे दिसून आले. चौथ्या फेरीचा वेळ संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात उमेदवाराने सकाळी ११.४१.३३.१०० वाजता धावण्यास सुरुवात करून ११.४८.०६.५५० वाजता फेरी समाप्त केल्याचे दिसले. मात्र, चौथ्या फेरीदरम्यान काही अंतर धावून तो ट्रॅकच्या बाहेर गेला व नंतर मॅटवरील स्कॅनरवर दोन्ही चिप स्कॅन करून फेरी पूर्ण केल्याचे भासविले. या प्रकारामुळे शासनाची दिशाभूल व फसवणूक झाल्याने समोर आले. त्यामुळे संबंधित उमेदवाराविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Web Summary : Solapur candidate Dinesh Rathod booked for cheating in police recruitment's 1600m race. He falsely completed the fourth lap, as revealed by CCTV footage, leading to legal action for deceiving the government.
Web Summary : पुलिस भर्ती की 1600 मीटर दौड़ में धोखाधड़ी करने पर सोलापुर के उम्मीदवार दिनेश राठौड़ पर मामला दर्ज। सीसीटीवी फुटेज से पता चला कि उसने चौथा लैप गलत तरीके से पूरा किया, जिसके कारण सरकार को धोखा देने के लिए कानूनी कार्रवाई की गई।