Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींशी गैरवर्तन, कॉलेजने पगारवाढ रोखली! समितीकडून ठपका; प्राध्यापकावर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:01 IST

अंधेरीतील सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई :

अंधेरीतील सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमधील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कॉलेजने प्राध्यापकाविरोधात कारवाई करत त्याची एका वर्षाची पगारवाढ रोखली आहे. तसेच प्राध्यापकाविरोधात काही महिला प्राध्यापकांनीही कॉलेजमधील अंतर्गत चौकशी समितीकडे तक्रार दाखल केली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. 

या कॉलेजमधील ४९ विद्यार्थिनींनी एका प्राध्यापकाविरोधात गैरवर्तन आणि छळाच्या तक्रारी नोव्हेंबर २०२२ मध्ये कॉलेज प्रशासनाकडे दाखल केली होती. त्यामध्ये ‘तुझा आवाज ऐकून अंगावर शहारे येतात’ आदी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे विद्यार्थिनींचे म्हणणे होते. तसेच हा प्राध्यापक विद्यार्थिनीला तोंडी परीक्षेला उशिरापर्यंत थांबवून ‘तुला भीती वाटते तेव्हा मला आनंद होतो,’ अशा पद्धतीची टिप्पणी करत होता. अनावश्यकपणे तासनतास थांबवून ठेवले जात होते, असाही विद्यार्थिनींचा आरोप होता. कॉलेज प्रशासनाने गेल्यावर्षी ९ जूनला अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने १५ सप्टेंबर २०२३ला सुनावणी पूर्ण करून त्याचा अहवाल कॉलेज प्रशासनाला सादर केला होता. त्यामध्ये सदर प्राध्यापकाने गैरवर्तन केल्याचा आणि विद्यार्थिनींना असह्य वाटेल, असा व्यवहार केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानुसार संबंधित प्राध्यापकावर कठोर कारवाई केली जावी, त्याच्याकडून बिनशर्त लेखी माफी घ्यावी, तसेच चालू आर्थिक वर्षाची पगारवाढ थांबवावी, अशी शिफारस समितीने केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, संबंधित अहवाल विद्यार्थिनींना तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळाने देण्यात आला. विद्यार्थिनींना हा अहवाल मिळविण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे धाव घ्यावी लागली. 

तक्रारींची दखल घेण्यास टाळाटाळ आम्ही कॉलेजकडे नोव्हेंबर २०२२ मध्ये तक्रार केली होती. मात्र, अनेक महिने कॉलेजने काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर कॉलेजने जून २०२३ ला समिती स्थापन केली.  मी प्रमुख तक्रारदारांपैकी असताना मला कारवाईचा अहवाल मागणी केल्यानंतर देण्यास दोन महिन्यांहून अधिक काळ लावला. या घटनेत कॉलेजकडून विद्यार्थिनींना सहकार्य मिळाले नाही, असा आरोप तक्रारीशी संबंधित एका विद्यार्थिनीने केला. 

टॅग्स :शिक्षकमुंबई