मुंबई - उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात चमत्कार करणार, असे तुम्ही म्हणता, पण चमत्कार त्यांच्याकडेही घडू शकतो, असा दावा करत उद्धव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या पाठीशी राज्यातील महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्याचे शुक्रवारी सांगितले. तसेच, महाराष्ट्रातील आमच्या खासदारांची एकजूट भक्कम असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.
उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची, तर सिल्व्हर ओकवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, चमत्काराची एक व्याख्या वा चौकट नसते. तो कोणत्याही बाजूने होऊ शकतो. महाविकास आघाडीची एकजूट भक्कम आहे आणि राहील. देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सी. पी. राधाकृष्णन यांच्यासाठी पाठिंबा मागितला होता. त्यांनी आमचा पक्ष फोडला, तरीही आमचे खासदार जिंकले, आता त्यांना या खासदारांचा पाठिंबा हवा आहे. गरज असताना वापरायचे आणि त्यांचे धोरण आहे. आता रेड्डी यांना मते द्या असा फोन मी देवेंद्र फडणवीस यांना करेन. आज देशाची लोकशाही संकटात आहे, असे मानणारे खासदार एनडीएमध्ये देखील आहेत, ते रेड्डी यांना मतदान करतील, असे वाटते. त्यामुळे चमत्कार कुठेही होऊ शकतो, असेही ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, आम्ही तर एकत्रच...रेड्डी यांच्यासमवेत सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्र परिषदेत शरद पवार म्हणाले की, बी. सुदर्शन रेड्डी हे आमचे एकमताने उमेदवार आहेत, आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीशी राहू. एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, मी त्यांचा सन्मान राखतो.मात्र, ते जेव्हा झारखंडचे राज्यपाल होते, त्यावेळी तेथील आदिवासी मुख्यमंत्र्यांना राजभवनात अटक झालेली होती. त्यामुळे एकूणच त्यांची भूमिका काय, हे लक्षात येते.
मी एका पक्षाचा नाहीन्या. रेड्डी म्हणाले की, आज मातोश्रीवर आल्याने मला आनंद झाला. मी कोण्या एका पक्षाचा उमेदवार नाही. त्यामुळे सर्वपक्षीय खासदार मला मतदान करतील, असा विश्वास आहे. घटनात्मक चौकटीत संसदेचे कामकाज चालले पाहिजे, पण आज तीच व्यवस्था धोक्यात आहे
यावेळी खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. रेड्डी यांनी टिळक भवनात काँग्रेसच्या नेत्यांशीही संवाद साधला. इंडिया आघाडीने मला उमेदवारी दिली असून मला पाठिंबा मिळावा यासाठी मी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना वैयक्तीक पत्र पाठवून विनंती करणार आहे. भाजपाच्या खासदारांनी वेळ दिली तर त्यांनाही भेटेन.- न्या. बी. सुदर्शन रेड्डी, उपराष्ट्रपतीपदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार