लोकमत न्यूज नेटवर्कमिरा रोड : मिरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीचा वाकलेला व एकाच जागेवर स्तब्ध झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर 'झोंबी डूंग' या नावाने प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, पोलिस आयुक्तालयातील काशीमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-१ ने या प्रकरणाचा छडा लावला असून, ती घटना अमली पदार्थाची नसून ती औषधांच्या अतिसेवनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी प्रभादेवी, बोरीवली आणि भाईंदर पश्चिम येथून शेकडो सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या नशेखोराला ताब्यात घेतले आहे, तर यात विना डॉक्टर प्रिस्क्रिप्शन औषध विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई केली जाणार आहे.
१५ एप्रिलला सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये ९० फिट रोड, भाईंदर पश्चिम येथे एक तरुण झोंबीप्रमाणे एकाच जागी गोठलेल्या अवस्थेत उभा असल्याचे दिसत होते. वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा कक्ष-१, काशिमीरा यांच्या पथकाने तपास सुरू केला. समीर राजेंद्र रावल (वय २२) असे त्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा नेपाळचा रहिवासी आहे. तो फेब्रुवारीमध्ये सुरत आणि मार्चमध्ये मिरा-भाईंदरमध्ये आला असून, सध्या बोरीवलीत बिगारी काम करतो. त्याला १७ एप्रिलला पोलिसांनी भाईंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून ताब्यात घेतले. त्याने झोंबी ड्रगचा कोणताही वापर केला नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रेगाबालीन गोळ्यांचे २ वर्षांपासून व्यसन
समीरला गेल्या २ वर्षांपासून प्रेगाबालीन गोळ्यांचे व्यसन आहे. १३ एप्रिलला त्याने नवधर नाका येथील मेडिकलमधून गोळ्यांची स्ट्रीप घेऊन एकाच वेळी ५ गोळ्या खाल्ल्याने चक्कर येऊ लागली आणि तो शरीरावरचा ताबा गमावून एकाच जागी स्थिर उभा राहिला. सोशल मीडियावर कोणत्याही अर्धवट माहितीसह व्हिडीओ व्हायरल करून भीती पसरवू नका, अशा प्रकरणांची शहानिशा पोलिस प्रशासन करीत असल्याचे आवाहन पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे.
Web Summary : Viral 'zombie drug' video in Mira-Bhayandar was due to medication overdose, not drugs. Police investigation revealed the man, a Nepal native, had consumed excessive pregabalin pills. Authorities urge public to avoid spreading misinformation.
Web Summary : मीरा-भायंदर में वायरल 'ज़ॉम्बी ड्रग' वीडियो दवाओं के ओवरडोज के कारण था, ड्रग्स नहीं। पुलिस जांच में पता चला कि नेपाल के एक व्यक्ति ने अत्यधिक प्रेगाबालिन गोलियां खाई थीं। अधिकारियों ने जनता से गलत सूचना फैलाने से बचने का आग्रह किया।