मिरा-भाईंदरचा कचरा मुंबईत? गोराई, शेपली गावात दुर्गंधी; प्रशासनाकडे तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 06:59 IST2026-03-29T06:58:24+5:302026-03-29T06:59:19+5:30
मुंबई : मुंबईतील कचरा टाकण्यासाठी फक्त एकच डंपिंग ग्राउंड असताना आता मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील कचरा मुंबई महापालिकेच्या हद्दीत टाकला ...

मिरा-भाईंदरचा कचरा मुंबईत? गोराई, शेपली गावात दुर्गंधी; प्रशासनाकडे तक्रार दाखल
मुंबई : मुंबईतीलकचरा टाकण्यासाठी फक्त एकच डंपिंग ग्राउंड असताना आता मिरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील कचरा मुंबई महापालिकेच्या हद्दीत टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उत्तन येथील डंपिंग ग्राउंडमधील कचरा गोराई आणि शेपली गाव परिसरात टाकला जात असल्याचा आरोप असून, गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनने याबाबत मुंबई व मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरा ५० हून अधिक डंपर गोराई-शेपली परिसरात येऊन कचरा टाकत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले आहे. ही कारवाई अंधाराचा फायदा घेत जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या संदर्भात काही छायाचित्रेही संबंधित अधिकाऱ्यांना सादर केल्याचे सांगितले जाते. या कचरा टाकण्यामुळे शेपली परिसरात दुर्गंधी पसरली असून, घराबाहेर पडणे मुश्कील झाल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.
सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी
या प्रकारावर तत्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरक्षारक्षक तैनात करावेत, कचरा टाकणाऱ्या कंत्राटदारांच्या वाहनांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच टाकलेला कचरा तातडीने हटवून त्याचा खर्च मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून वसूल करावा, अशी मागणी गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.
संसर्गजन्य आजारांचा धोका
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच, या प्रकारामुळे पर्यावरणीय हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या प्रकरणी यापूर्वीही तक्रार करण्यात आली होती; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.