Join us
Daily Top 2Weekly Top 5

उतरण्यावरून किरकोळ वाद, प्राध्यापकाला मारले; मालाड प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:47 IST

Malad Railway Station Case: मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.

Malad Railway Station Case: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट बोरीवली लोकलमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मालाड स्टेशनवर एका अनोळखी हल्लेखोराने एन. एम. कॉलेजचे प्रा. आलोक कुमार सिंग यांच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हल्ल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा रेल्वे पोलिस शोध घेत होते. अखेर मालाड प्रकरणातील आरोपी सापडला असून, पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.  

प्रा. आलोक विलेपार्ले स्टेशनवर गाडीत चढले. ते कांदिवलीला उतरणार होते. ट्रेन मालाड स्टेशनजवळ असताना त्यांचा एका सहप्रवाशाशी उतरण्यावरून किरकोळ वाद झाला. गाडी स्टेशनवर येताच त्या माथेफिरू प्रवाशाने आलोक यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला धारदार शस्त्राने वार केला आणि तो पळून गेला. या घटनेची माहिती काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या आलोक यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

आरोपी मालाडमधील कुरार व्हिलेज भागातील रहिवासी 

प्रा. आलोक सिंह यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला होता. रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळावरील आणि स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याचा माग काढला. ओंकार शिंदे असे या आरोपीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी ओंकार शिंदे याला वसई स्थानकातून ताब्यात घेतले. ओंकार शिंदे हा मालाड कुरार व्हिलेज इथे राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला का गेला, याचे नेमके कारण कळू शकले नव्हते. फक्त धक्का लागल्याचा राग आल्याने ओंकार शिंदे याने इतके टोकाचे पाऊल उचलले का, हे आता तपासले जाणार आहे.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नशेत होता. त्याने प्रा. आलोक यांच्यावर वार केला आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. हल्लेखोराचा कसून शोध घेण्यात येत आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. प्रा. आलोक विलेपार्ले पश्चिम येथील नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये शिकवत होते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Professor stabbed over argument at Malad station; Accused arrested.

Web Summary : Professor Alok Kumar Singh was stabbed to death at Malad station following an argument. The accused, identified as Onkar Shinde, a resident of Kurar Village, Malad, has been arrested from Vasai station. Police investigation is underway to determine the motive.
टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई लोकललोकलगुन्हेगारीअटकमुंबई पोलीस