Mumbai Crime: मुंबईतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. मुंबईत किशोरवयीन मुलांमध्ये असलेल्या समलैंगिक संबंधातून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. दोन मुलांमध्ये समलैंगिक संबंध होते. मात्र दोघांमधील मैत्री तुटली आणि एका मुलाने दुसऱ्या मुलाची हत्या केली. हत्येनंतर १९ वर्षीय जोडीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपीने १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोल्ड्रिंक दिले होते, जे पिऊन त्याचा मृत्यू झाला असं मृताच्या वडिलांनी सांगितले.
पीडित मुलगा २९ जून रोजी बाहेर फिरायला गेला होता. मात्र, तो घरी परतला नाही, त्यामुळे वडील काळजीत पडले आणि त्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि शोध सुरू केला. मुलाचा शोध सुरु असताना त्याचे वडील आरोपीच्या घरी गेले. आरोपीच्या घरी पोहोचलो तेव्हा अल्पवयीन मुलगा खाली पडला होता आणि आरोपी त्याच्या शेजारी बसला होता, असं मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले.
मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उठला नाही. यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले. आरोपीने पीडित मुलाला मादक पदार्थ असलेले कोल्ड्रिंक दिले होते, ज्यामुळे त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती तपासातून समोर आली. पोलीस सध्या फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, मुलाच्या वडिलांनी तक्रारीत असेही म्हटले की आरोपीने आमच्या मुलाला कुटुंबाला न कळवता चार महिन्यांपूर्वी नागपूरला नेले होते. पण जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने आरोपीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले. मात्र यामुळे आरोपी संतापला आणि त्याने नंतर हत्येचा कट रचून त्याची हत्या केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.