Join us  

'नाराज मंत्री विजय वडेट्टीवारांकडे 'ते' खातं असल्यानं ते भूकंप घडवतील मग पुनर्वसन करतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 3:39 PM

ठाकरे सरकारमध्ये अनेक जण नाराज आहेत. तिन्ही वेगळ्या विचारधारेचे हे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे.

ठळक मुद्देठाकरे सरकारमध्ये अनेक जण नाराज आहेत...तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे

मुंबई - राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याचं समोर येतंय. यातच दुय्यम दर्जाची खाती दिल्याने काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठकीला तसेच सरकारच्या विशेष अधिवेशनालाही दांडी मारली आहे. त्यावरुन विरोधकांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

याबाबत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये अनेक जण नाराज आहेत. तिन्ही वेगळ्या विचारधारेचे हे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. विजय वडेट्टीवार यांची नाराजी समोर येत आहे. त्यांना दुय्यम दर्जाची खाती दिली गेली. त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जातं आहे. भूकंप पुनर्वसन  खातं त्यांच्याकडे आहे त्यामुळे कदाचित ते भूकंप घडवतील मग पुनर्वसन  करतील असा टोला त्यांनी लगावला. 

तसेच मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी बसण्याच्या खुर्चीवरुन छगन भुजबळ आणि अशोक चव्हाण यांच्यात वाद झाला होता त्यावरुन आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल असं वाटतं असा चिमटा सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काढला आहे. आजच्या विशेष अधिवेशनावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागील रांगेत बसण्याची जागा दिल्यानेही सभागृहाची अशी परंपरा नाही, चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची जागा पहिल्या रांगेत असायला हवी होती. मात्र सभागृहाची परंपरा या सरकारकडून पाळली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा-मनसे युतीबाबतही भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंशी भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं. राज्यातील बदलेली सत्तासमीकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल का असं कोणी म्हटलं तर वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र झालेच नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे भविष्यात काहीही होऊ शकतं असे त्यांनी संकेत दिले आहेत. 

दरम्यान कॉंग्रेसच्या प्रतिकूल काळात वडेट्टीवार यांनी विदर्भात कॉंग्रेसला ताकद देण्याचे काम केले. विरोधी पक्षनेता राहिल्यामुळे त्यांना महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाचा मान मोठा असतो व हे पद भूषविल्यानंतर दुय्यम खाती मिळाल्याने वडेट्टीवार नाराज झाले. वडेट्टीवार यांना दुय्यम खाती दिल्यामुळे त्यांचे समर्थकदेखील विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :विजय वडेट्टीवारभाजपासुधीर मुनगंटीवारकाँग्रेस