Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आईचे मंगळसूत्र गहाण ठेऊन विद्यार्थ्यांनी कर्ज काढलंय;दलालांनो त्यांचे पैसे परत करा, अन्यथा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 20:57 IST

जितेंद्र आव्हाड एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: म्हाडामधील नौकर भरतीसाठी  होणार आहेत. यापूर्वी आरोग्य विभागातील भरतीकरिता परीक्षा झाल्या आणि पेपर फुटीचे प्रकरण बाहेर पडले. यावरून वादंग सुरू असताना म्हाडा भरतीमध्ये आर्थिक व्यवहार झाले असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कानावर आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी दोषींना सोडले जाणार नाही, असा सज्जड दम दिला आहे. 

जितेंद्र आव्हाड एवढ्यावर ते थांबले नाहीत तर आता परीक्षा रद्द न करता पुन्हा मुख्य परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्हाडामधील परीक्षेत होणाऱ्या गडबडीला वेळीच आळा घेतला जाईल, असे आव्हाड यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात स्पष्ट केले. तसेच ट्विटरद्वारे देखील त्यांनी दलाली करणाऱ्यांना इशारा दिला आहे. 

म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. काही जणांनी आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. असे करून त्यांनी पैसे दलालांना दिले आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

माझी या दलालांना नम्र विनंती आहे कि हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत. गरीबाचे शाप घेऊ नका कृपया म्हाडाची नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे घेतलेत त्यांनी उद्या रात्रीपर्यंत ते पैसे परत करावेत. कारण तुमच्या पैशाने हे काम होईल हा जरी तुम्हांला कोणी विश्वास दिला असेल तर ते कदापि शक्य नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दलाली करणाऱ्यांना दिला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित केली असून या परीक्षेदरम्यान अनेक ठिकाणी पैसे भरून पास करण्याच्या अफवा सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. अशा अफवा पसरवणाऱ्यांबद्दल पोलिसांना माहिती द्यावी, अशा व्यक्तींवर कडक गुन्हे दाखल केले जातील, असं आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

टॅग्स :जितेंद्र आव्हाडम्हाडा