Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओएनजीसी बार्ज पी ३०५ अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांची मंत्री अस्लम शेख यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 17:38 IST

ओएनजीसी बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांची राज्याचे बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

मुंबई : ओएनजीसी बार्ज पी ३०५ दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांची राज्याचे बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतकांच्या कुटुंबीयांना  केंद्र सरकारने तात्काळ मदतजाहिर करण्याचे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. 

मुंबई हाय जवळ ओएनजीसीच्या बार्जचा अपघात झाला. हा अख्खा बार्ज 'तौत्के' चक्रीवादळाच्या तडाख्यात वाहून गेला. त्यामध्ये आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मंत्री अस्लम शेख पुढे म्हणाले की, ही घटना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घडली असल्याकारणाने मुंबई पोलीसांकडून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह मिळविण्यात कोणतीही अडचण येऊ नये याकरीता आपण जे.जे. प्रशासन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत. आतापर्यंत एकूण ७ जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारकडून या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज असल्याचे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.

टॅग्स :ओएनजीसीतौत्के चक्रीवादळ