Join us  

"आधी आपण आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखा, मग माझ्यावर टीका करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 2:56 PM

नितेश राणेंच्या या टीकेनंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. 

मुंबई/ अहमदनगर: भाजपाचे नेते नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली होती. या टीकेनंतर नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

नितेश राणे यांनी ज्यांच्या नावातच गुलाब आहे. त्यांनी धंद्याबद्दल बोलू नये. अशा माणसाबद्दल काय टीका करणार? तुमची उंची किती, नारायण राणेंची उंची किती हे पाहा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. तसेच टीका करायला ते दिवसातून किती तास शुद्धीत असतात. हे शुद्धीत कधी असतात याची आता माहिती घेऊन नंतरच बोलू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी गुलाबराव पाटील यांना दिला होता. नितेश राणेंच्या या टीकेनंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर भगवा सोडून पळाले, काँग्रेसमध्ये गेले, नंतर भाजापमध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही. त्यामुळे आधी आपण आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखावी, नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करावी, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर केला आहे. अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर प्रहार केला आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. हे त्यांचे पोटे तेव्हा बनियनवर असतील. आता त्यांनी मला शिकवू नये . मी ३६ वर्षे शिवसेनेत असलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच मी जेव्हा नितेश राणे यांच्या वडिलांच्या मागे उभा होतो. तेव्हा ते फाइटर बटालियनमध्ये माझे नाव घेत होते. आता नारायण राणेंना मी कसा काय वाईट वाटायला लागलो, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे नैराश्यामध्ये असलेल्या माणसाला काही उद्योग नसतो, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यांच्या या टीकेनंतर नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण-

दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. तसेच नाणारबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण राणे यांनी जनता ज्या दिशेने जाईल त्या दिशेने आम्ही जाणार असल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं होतं. नारायण राणेंच्या या विधानानंतर शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले होते.

नारायण राणे हे आता सुशुक्षित बेरोजगार राजकारणी झाले आहेत. त्यांना काही कामधंदा राहिलेला नाही. त्यामुळे ते आधी वेगळं बोलतात, नंतर काही बोलतात. नारायण राणे यांना बोलण्याची टीआरपी वाढवायची असते, त्याशिवाय त्यांच्याकडे दूसरा काही उद्योग राहिलेला नाही. नारायण राणे बोलल्याशिवाय त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे ते काहीही बोलत असतात, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केली होती. तसेच नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले? राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं, सेनेत असताना मुख्यमंत्रीपदही दिलं. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये,' असा टोला गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला होता.

टॅग्स :नारायण राणे नीतेश राणे शिवसेनाभाजपा