मिनी मखर, वॉटरप्रूफ सजावटीचा ट्रेंड, कागद, बांबूच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:13 IST2025-08-25T13:12:15+5:302025-08-25T13:13:11+5:30
Ganesh Mahotsav News: गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. फुलांची आरास, मूर्तींच्या सजावटीचे साहित्य, विद्युत दिवे, रोषणाईच्या माळा, विविध प्रकारचे मखर विक्रीस आले आहेत. पर्यावरणपूरक मखर व सजावटीला जास्त मागणी दिसून येते आहे.

मिनी मखर, वॉटरप्रूफ सजावटीचा ट्रेंड, कागद, बांबूच्या वस्तूंना ग्राहकांची पसंती
- सचिन लुंगसे
मुंबई - गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले आहे. फुलांची आरास, मूर्तींच्या सजावटीचे साहित्य, विद्युत दिवे, रोषणाईच्या माळा, विविध प्रकारचे मखर विक्रीस आले आहेत. पर्यावरणपूरक मखर व सजावटीला जास्त मागणी दिसून येते आहे. बांबू, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली मखरे, फोल्डेबल डिझाइन्स, तर घरगुती गणेशासाठी मिनी मखर ही नवीन संकल्पना बाजारात आहे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन वॉटरप्रूफ सजावटीचे साहित्य, तसेच एलईडी लाइट्सचा वापर करून केलेली रोषणाई ग्राहकांना आकर्षित करत आहे.
बाजारपेठेत सर्व वयोगटांतील खरेदीदारांची गर्दी होत आहे. नवीन ट्रेंडिंग मखर, तसेच संकल्पनेवर आधारित सजावटीकडे तरुणाईचा कल आहे. शिवकालीन किल्ले, अयोध्येतील राममंदिर, विविध देव-देवातांची कटआउट्स व एलईडी दिव्यांच्या मखरांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
लघुउद्योजकांना संधी
गणेशोत्सवामुळे मूर्तिकार, डेकोरेटर्स, मखर निर्माते, इलेक्ट्रिक सामान विक्रेते, फुले आणि मिठाई व्यावसायिकांसाठी हा हंगाम रोजगाराचा मोठा स्त्रोत आहे.
गणेशोत्सवामुळे लघुउद्योजकांना भरभराटीची संधी मिळते आहे. दोन महिन्यांच्या विक्रीत वर्षभराचा व्यवसाय उभा राहत आहे, असे विक्रेते राहुल घोणे यांनी सांगितले.
शुगर-फ्री मिठाई
मिठाई विक्रेत्यांकडे मोदक, पेढे, लाडू, बर्फी, अनारसे यांना मोठी मागणी आहे. अनेकांनी शुगर-फ्री व मिलेटपासून बनवलेले मोदक विक्रीस ठेवले आहेत.
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फुलांच्या बाजारात झेंडू, गुलाब, कमळ व विविध रंगांची फुले उपलब्ध आहे.
एलइडी स्ट्रिप लाइट्स, कंदील, कलरफुल प्रोजेक्शन लाइट्स यांना मोठी मागणी आहे. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, दिव्यांच्या विक्रीत मागील वर्षांच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ प्रत्येक शहर आणि प्रत्येक परिसर निहाय वेगळी आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाची सांगड
‘गगनचुंबी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित मखरांना भरघोस प्रतिसाद आहे. काही कलाकारांनी ऐतिहासिक घटना व समकालीन विज्ञान-तंत्रज्ञानाची सांगड घालून मखरांची रचना केली आहे. श्रद्धा, संस्कृती व आधुनिकता यांचा संगम दिसत आहे.
‘मेड इन इंडिया’ला पसंती
‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. गणेशोत्सव तोंडावर असल्याने सोमवार आणि मंगळवारी खरेदीला उधाण येईल. श्रद्धा, परंपरा, आधुनिकता आणि पर्यावरणपूरकतेचा संगम घडवत बाजारपेठा सजल्या आहेत.
कंदील, एलईडी दिव्यांचा झगमगाट
कंदील, एलईडी दिवे, फ्लॅशिंग सिरीज व डेकोरेटिव्ह लाइट्स यांच्या विक्रीत
लक्षणीय वाढ झाली आहे. दादर, भेंडीबाजार, झवेरी बाजार व घाटकोपरसारख्या प्रमुख भागांमध्ये रोषणाईच्या स्टॉल्सवर झगमगाट पाहायला मिळत आहे.