Join us

गिरणी कामगारांचे वेतन ९ महिन्यांपासून रखडले; सरकारची न्याय देण्याची इच्छा नसल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:05 IST

आता गेल्या ९ महिन्यांपासून वेतन पूर्णतः बंद आहे...

मुंबई : मुंबईतील ‘एनटीसी’च्या टाटा, इंदू मिल क्र. ५, पोदार, दिग्विजय गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२४ पासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांची दयनीय अवस्था झाली आहे.     या गिरण्या कोरोना काळापासून बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर दीर्घ लढ्यानंतर वेतन सुरू करण्यात आले होते. आता गेल्या ९ महिन्यांपासून वेतन पूर्णतः बंद आहे.

या गिरण्या केंद्र सरकारने आर्थिक टंचाईच्या कारणावरून बंद केल्या. त्यानंतर उत्पादन सुरू करण्याची मागणी कामगारांनी केली; पण अर्धे वेतन दिले जात होते. गत ऑक्टोबरपासून पूर्ण वेतन बंद झाल्याने कामगारांना जगणे अशक्य झाले. गिरण्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वर्षोनुवर्षे पडून आहे. 

या पार्श्वभूमीवर गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे का? असा प्रश्न कामगार विचारत आहेत.

आंदोलनांद्वारे वेधले लक्षराष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते याबाबत म्हणाले, कामगारांनी निदर्शने, आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

 केंद्र सरकारने या गिरण्या पूर्ववत चालवाव्यात व कामगारांना पूर्ण पगार देण्याची गरज आहे. कामगारांना न्याय देण्याची सरकारची मानसिकता व इच्छा नाही.

हमाली करण्याची वेळ‘टाटा मिल’मधील अशोक गावडे म्हणाले, पगार बंद झाल्याने घर चालवण्यासाठी हमाली व इतर कामे करावी लागतात. मुलांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्याने कर्ज घेऊन खर्च करावा लागतो. सुभाष नारकर म्हणाले, वेतन मिळत नसले तरी गिरणीत कामावर जावे लागते. कामगार आता निराशेच्या गर्तेत जाऊ लागले आहेत.

 

टॅग्स :मुंबईकर्मचारीसरकार