Datta Iswalkar : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 22:24 IST2021-04-07T22:00:35+5:302021-04-07T22:24:09+5:30
Mill worker leader Datta Iswalkar passes away : दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे गिरणी कामगार संघर्षातील एक पर्व संपले.

Datta Iswalkar : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन
मुंबई : गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे बुधवारी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मुंबईतील जे जे रुग्णालयात आज संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, ४ मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यदेह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या सात रस्ता येथील राहत्या घरी मॉडर्न मिल कम्पाऊंडमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Mill worker leader Datta Iswalkar passes away )
दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे गिरणी कामगार संघर्षातील एक पर्व संपले. १९८९ साली त्यांनी गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास सुरूवात केली होती. त्याचवेळी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली होती. समितीच्या स्थापनेनंतर एका वर्षांनी गांधी जयंतीला दत्ता इस्वलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगारांच्या बेमुदत उपोषणाला बसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मध्यस्थीने उपोषण सुटले.
मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये दत्ता इस्वलकर यांचे वडिल जॉबर होते. १९७० साली वयाच्या २३ व्या वर्षी दत्ता इस्वलकर हे मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी निकटचा संबंध असलेले दत्ता इस्वलकर यांनी १९८७नंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यास प्राधान्य दिले होते. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष होते.