मिलिंद एकबोटेला मिळाला लाखाचा अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:36 AM2018-02-08T04:36:21+5:302018-02-08T04:36:32+5:30

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी व हिंदू जनजागृती संघटनेचा अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक लाख रुपयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Milind Aibota got anticipatory bail for Lakhan | मिलिंद एकबोटेला मिळाला लाखाचा अटकपूर्व जामीन

मिलिंद एकबोटेला मिळाला लाखाचा अटकपूर्व जामीन

Next

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी व हिंदू जनजागृती संघटनेचा अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक लाख रुपयांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पुण्यातील न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर एकबोटे याने उच्च न्यायालयात अपील केले होते. तेही २ फेब्रुवारी रोजी फेटाळले गेल्यानंतर त्याने तातडीने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनमती याचिका दाखल केली. त्यावर न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व या हिसाचारात मृत्यू पावलेल्या संजय रमेश भालेराव यांच्या कुटुंबियांना नोटीस काढून पुढील सुनावणी २० फेब्रुवारी रोजी ठवली.
दरम्यानच्या काळात शिकरपूर पोलिसांनी एकबोटे याना अटक केल्यास एक लाख रुपयांचा जातमुचलका व तेवढ्याच रकमेच्या दोन जामिनांवर त्यांची सुटका केली जावी, असा आदेश खंडपीठाने दिला. जामीन दिल्यास पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तपासात हस्तक्षेप न करणे, साक्षीदारांशी संपर्क न करणे वगैरे अटी लागू असतील, असेही स्पष्ट केले गेले.
दंगलीतील मृत भालेराव यांच्या कुटुंबियांनाही न्यायालयाने या सुनावणीत सहभागी होण्याची मुभा दिली. त्यांच्यावतीने प्रतिक आर. बोंबार्डे व नितिन शिवराम सातपुते हे वकील उपस्थित होते.
>शांतता भंग होणार नाही
एकबोटे याच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी असे प्रतिपादन केले की, आता त्या भागातील परिस्थिती पूर्णपणे शांततापूर्ण आहे व एकबोटेच्या बाहेर राहण्याने शांततेचा भंग होण्याची कोणतीही शक्यता नाही. रोहटगी यांच्या या प्रतिपादनानुसार त्या भागातील परिस्थिती आता कशी आहे याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने
१० दिवसांत करावे, असे न्यायालयाने सांगितले.
उच्च न्यायालयाने फक्त आदेशात्मक भाग दिला आहे व सविस्तर निकालपत्र अद्याप दिलेले नाही, असेही रोहटगी यांनी निदर्शनास आणले. यावर न्यायालयाने आपल्या प्रशासनास याची शहानिशा करण्यास सांगितले.

Web Title: Milind Aibota got anticipatory bail for Lakhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.