पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईत उभे राहतेय मायक्रो फॉरेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:41 AM2020-01-01T05:41:02+5:302020-01-01T05:41:12+5:30

तरुणासह पालिकेचा पुढाकार; १०० ऐवजी दहा वर्षांत जंगल उभे करणे शक्य

Micro Forest stands in Mumbai for environmental conservation | पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईत उभे राहतेय मायक्रो फॉरेस्ट

पर्यावरण संवर्धनासाठी मुंबईत उभे राहतेय मायक्रो फॉरेस्ट

Next

- सचिन लुंगसे 

मुंबई : नवीन जंगल तयार करणे गरजेचे आहेच, पण त्याही आधी जी जंगले व इतर नैसर्गिक संसाधने आहेत, त्याचे जतन करणे अत्यावश्यक आहे, ही मुख्य बाब लक्षात घेत, आरे येथील जंगल वाचविण्यासाठी काम करत असलेला सुशांत बळी नावाचा तरुण सरसावला आहे. मुंबई महापालिका आणि नागरी सहभागातून सुशांत मुलुंड येथे मायक्रो फॉरेस्ट तयार करत असून, जे जंगल निर्माण होण्यासाठी शंभर वर्षे लागतात; ते जंगल या माध्यमातून चक्क दहा वर्षांत तयार होईल, असा दावा सुशांतने केला आहे.

या प्रकल्पाद्वारे पर्यावरणाचे संवर्धन होईल. नव्या पिढीसह सर्व मुंबईकरांना पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण होत झाडे वाचविण्यासाठी व झाडांचे रोपण करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. सुशांतने सांगितले की, मुलुंड पूर्वेला हरिओमनगर येथे मुंबई पालिकेचे आर.आर. पाटील नावाचे उद्यान आहे. पालिकेने या उद्यानात मायक्रो फॉरेस्ट तयार करण्यासाठी शंभर चौरस मीटर जागा दिलीे. जुलैमध्ये आम्ही येथे शंभर स्थानिक झाडे लावली. केवळ सहा महिन्यांत ती सहा फूट उंच वाढली. हे करण्यापूर्वी आम्ही स्थानिक झाडांचा अभ्यास केला. आरे कॉलनीत कोणती स्थानिक झाडे आहेत, त्याचा अभ्यास केला. यासाठी येथील आदिवासी बांधवांची मदत घेतली. नैसर्गिक खत वापरावर भर दिला. जुलैमध्ये झाडांचे रोपण करताना हरिओमनगर येथील रहिवासी, अन्य मुंबईकरही सहभागी झाले. आताही माझ्यापेक्षा जास्त हरिओमनगर येथील रहिवासी मायक्रो फॉरेस्टची देखभाल करत आहेत. यासाठी मुंबई महापालिकेची मोठी मदत झाली. कारण जागेसह कामगारही पालिकेने दिले. जंगल तयार करण्यासाठीची रोपे आपण पुण्याहून आणली.

आता आम्ही मायक्रो फॉरेस्टच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. २५ डिसेंबर म्हणजे नाताळच्या दिवशी १२ चौरस मीटरच्या जागेत आम्ही पूर्वीप्रमाणेच अभ्यास करून ३५ झाडे लावली. आता येथे आवळा, कदंब, काटेसावर, पळस अशी किमान वीस ते पंचवीस प्रजाती असलेली झाडे लावत आहोत. या प्रकल्पाचा खर्च सुमारे ८५ हजार रुपये आहे. हा पैसा नागरी निधीतून उभा राहात आहे. काही निधी आॅनलाइनच्या माध्यमातून गोळा करत आहोत. मागच्या वेळेला कामगारांचा खर्च रोटरी क्लब आॅफ ठाणे यांनी दिला होता. म्हणजे नागरी निधीतून मायक्रो फॉरेस्ट निर्माण होत आहे.

मुंबई महापालिका, सुशांत बळी, उत्तरा गणेश, जयेश गडा, सारंग, प्रीती आणि आनंद, डॉ. रश्मी, रोटरी क्लब आॅफ ठाणे, सचिन इनामदार, समीर, सुधा शंकरनारायण ही एवढी मोठी टीम मायक्रो फॉरेस्ट उभे करण्यासाठी काम करत आहे.

‘निसर्ग संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे’
मुंबईत झाडे तोडली जातात. छाटली जातात. आहे ते जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे निसर्गाची हानी होत आहे. परिणामी, असे प्रकल्प उभे करत आपण निसर्ग संवर्धनासाठी हातभार लावू शकतो, ते गरजेचे आहे, पण हे करताना आहे ते जंगल वाचविण्यासाठी काम केले पाहिजे, हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. असे प्रकल्प मुंबई अथवा कुठे उभे करायचे, असा प्रश्न पडला असेल, तर आम्ही नक्की मार्गदर्शन करू शकतो, असेही सुशांतने सांगितले. आमचे काम कोणासाठी तरी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते, असेही त्याने सांगितले.

Web Title: Micro Forest stands in Mumbai for environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.