मुंबई : ‘म्हाडा’ने मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे. येत्या दिवाळीत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडून सुमारे ५ हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची घोषणा ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केली.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात नागरिक सुविधा केंद्र व अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी संजीव जयस्वाल बोलत होते. संजीव जयस्वाल म्हणाले, ‘म्हाडा’कडून मुंबई शहर आणि उपनगरात पुनर्विकासासह समूह पुनर्विकासाचे प्रकल्प राबविले जात आहेत. सेस म्हणजे उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करतानाच म्हाडाच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचे कामही हाती घेण्यात आले आहे. वरळी येथील आदर्शनगर, चुनाभट्टी येथील गुरू तेगबहादूरनगर, मोतीलालनगर, जोगेश्वरीमधील ‘पीएमजीपी’ कॉलनीसह म्हाडाच्या जुना, मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या माध्यमांतून रहिवाशांना दिलासा दिला जाणार आहे.
म्हाडाला पुनर्विकासाच्या माध्यमांतून घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या तुलनेत कमीच असल्या तरी घरांच्या किमती परवडणाऱ्या ठेवण्यासाठी उत्पन्न गटाचे निकष बदलतानाच किमतीबाबतही अभ्यास केला जात आहे. मुळात मुंबईत घरांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेणे शक्य नाही. तरीही सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून म्हाडा काम करत आहे, असेही संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे.
१५ मेदरम्यान चाव्या
वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम वेगाने सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांचा ताबा देण्यासाठी लॉटरीही काढण्यात आली. मात्र, ओसी आणि तत्सम बाबींमुळे रहिवाशांना घरांचा ताबा देत आला नाही. मात्र, याप्रकरणी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या बोलणे झाले असून, त्यानुसार ओसी आणि इतर परवाने मिळत आहेत. १५ मेदरम्यान, पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरांच्या चाव्या मिळतील, असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.