म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:22 IST2025-08-09T11:22:02+5:302025-08-09T11:22:22+5:30
नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरणे यासाठी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून ते २५ ऑगस्ट रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत आहे.

म्हाडा मुंबईमधील १४९ दुकाने विकणार, नोंदणी, अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्टपासून प्रारंभ
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील १४९ अनिवासी गाळे ई-लिलाव विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
लिलावात मुलुंड गव्हाणपाडा येथे ६ अनिवासी गाळे, कुर्ला-स्वदेशी मिल येथे ५, तुंगा पवई येथे २, कोपरी पवई येथे २३, चारकोप येथे २३, जुने मागाठाणे बोरिवली पूर्व येथे ६, महावीरनगर कांदिवली पश्चिम येथे ६ अनिवासी गाळे, प्रतीक्षानगर सायन येथे ९, अँटॉप हिल वडाळा येथे ३, मालवणी मालाड येथे ४६ अनिवासी गाळे, बिंबिसारनगर गोरेगाव पूर्व येथे १७ अनिवासी गाळे व शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर, मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे प्रत्येकी १ अनिवासी गाळा विक्रीसाठी आहे. २८ ऑगस्ट सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव वेबसाइटवर होणार आहे.
अर्ज करण्यासाठी मुदत कधीपर्यंत ?
नोंदणी करणे, ऑनलाइन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरणे यासाठी १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून ते २५ ऑगस्ट रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदत आहे.
ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय
ई-लिलावासाठी अर्ज करतेवेळी १८ वर्षांपेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून, ऑफसेट किमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.
२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वेबसाइटवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.