म्हाडा काढणार ५ हजार २८५  घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:16 IST2025-07-12T17:14:16+5:302025-07-12T17:16:04+5:30

कोकण मंडळाची सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.

mhada to hold lottery for 5 thousand 285 houses | म्हाडा काढणार ५ हजार २८५  घरांची लॉटरी

म्हाडा काढणार ५ हजार २८५  घरांची लॉटरी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग),  कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता  म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कोकण मंडळाची सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३ हजार २ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्‍या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

१३ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.

१४ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. 

सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल.

२५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.

सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता  प्रसिद्ध होईल.

३ सप्टेंबर  रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाणार आहे.

Web Title: mhada to hold lottery for 5 thousand 285 houses