वेळेत हप्ता न भरणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:54 IST2025-10-05T08:54:08+5:302025-10-05T08:54:08+5:30
चार हजार चौमी व त्याहून अधिक भूखंड क्षेत्रफळाच्या प्रकल्पांसाठी सहा टप्प्यांमध्ये हप्ते द्यावे लागणार आहेत.

वेळेत हप्ता न भरणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत विनियम ३३ (५) अंतर्गत अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाच्या वितरणाकरिता संस्था, बिल्डरांकडून घेण्यात येणाऱ्या अधिमूल्य (प्रीमियम) रकमेचा चार समान हप्त्यांमध्ये व्याजासह भरणा करण्याकरिता म्हाडाने मंजुरी दिली आहे. संस्था/बिल्डरांनी अधिमूल्य रकमेचा भरणा देकारपत्राच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत केल्यास व्याज लागू होणार नाही. मात्र रक्कम भरण्यास उशीर झाल्यास संबंधित रकमेवर व्याज भरावे लागणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले.
संस्था, बिल्डरांनी हप्ते मुदतीत न भरल्यास थकीत अधिमूल्य रकमेवरील आकारण्यात येणारे दंडनीय व्याज पुढील कालावधीकरिता १८ टक्के सरळ व्याजदरासह संस्थेने/बिल्डरने भरणे बंधनकारक असेल. देकारपत्रामध्ये नमूद कालावधीमध्ये संपूर्ण अधिमूल्य रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण अधिमूल्य रकमेचा भरणा न केल्यास, उर्वरित अधिमूल्यावर पुढील कालावधीकरिता १८ टक्के सरळ व्याजासह अधिमूल्याचा भरणा करणे बंधनकारक असेल.
टप्प्याटप्प्यात रक्कम भरण्याची मुभा
पहिल्या हप्त्याचा भरणा (१० टक्के अधिमूल्य रक्कम) देकार पत्राच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत भरणे संबंधित संस्थेस बंधनकारक असणार आहे. याशिवाय दुसरा २२.५ टक्के अधिमूल्य हप्ता बाराव्या महिन्याअखेरीस, तिसरा २२.५ टक्के हप्ता चोविसाव्या महिन्याअखेरीस, चौथा २२.५ टक्के हप्ता ३६व्या महिन्याअखेरीस व पाचवा २२.५ टक्के हप्ता ४८व्या महिन्याअखेरीस भरणा व्याजासह करणे संस्थेस बंधनकारक असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.