सचिन लुंगसे
मुंबई : म्हाडाच्याकोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला. मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदारांना ६ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली. ७ जानेवारी रोजी रात्री ११.५९ पर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन व संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत होती.
अर्जदारांना मोबाईलवर माहिती मिळेल
सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्याhttps://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सोडतीत सहभाग घेणार्यात अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीच्या दिवशी अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच सोडत ऍपवर प्राप्त होणार आहे.