७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:35 IST2025-10-07T06:35:12+5:302025-10-07T06:35:43+5:30
MHADA Lottery 2025: दोनदा काढली लॉटरी; आता ‘ती’ घरे ओपन टू ऑलनुसार थेट विकली जाणार

७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ताडदेवमध्ये म्हाडाची चार घरे असून, या घरांची किंमत प्रत्येकी तब्बल सहा ते सात कोटी आहे. म्हाडाने दोन वेळा या घरांचा लॉटरीत समावेश केला. मात्र, या घरांना प्रतिसादच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता ही घरे ओपन टू ऑलनुसार थेट विकली जाणार आहेत. तरीही अशीच परिस्थिती राहिली तर तर मात्र ही घरे भाड्याने देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत लॉटरीमध्ये विशिष्ट कॅटेगरीसाठी ही घरे राखीव होती. मात्र, आता ही घरे ओपन टू ऑलसाठी असणार आहेत. जे ग्राहक घर खरेदीसाठी येतील, त्यांना आहे त्याच किमतीमध्ये घरे दिली जातील. तरीही ही घरे विकली गेली नाहीत तर मात्र शेवटचा पर्याय म्हणून घरे भाड्याने दिली जातील.
दरम्यान, गृहनिर्माण प्रकल्प राबविताना बिल्डरला म्हाडाला हाउसिंग स्टॉक, प्रिमियमच्या माध्यमातून ठरावीक घरे द्यावी लागतात. २०२२-२३ मध्ये एका बिल्डरकडून म्हाडाला ताडदेव येथे क्रिसेंट टॉवरमध्ये घरे मिळाली. मात्र, दोनएक वर्षांपासून ही घरे पडून आहेत.
पाच वर्षांअगोदर म्हाडाचे
घर विकता येणार नाही
म्हाडाचे घर सुरुवातीला दहा वर्षांपर्यंत विकता येत नव्हते. कालांतराने ही मर्यादा पाच वर्षांची करण्यात आली. आता ही मर्यादा तीन वर्षांची करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. पाच वर्षांची मर्यादा तीन वर्षांची करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, प्राधिकरणात प्रस्ताव सादर करण्यात आला.
आता नव्याने अभ्यास करून प्रस्ताव सादर होईल. त्यामुळे आता घर विकण्यासाठीची कोणतीही मर्यादा काढण्यात आलेली नसून सध्या लागू असलेली कालमर्यादा कायम आहे.