म्हाडा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबईत मिळाली घरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 13:16 IST2025-10-21T13:14:31+5:302025-10-21T13:16:06+5:30
सेवानिवासस्थानासाठी प्रतीक्षा यादी शून्यावर

म्हाडा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, मुंबईत मिळाली घरे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईमध्ये भाडेतत्त्वावर घर घेणे म्हाडाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी कल्याण, टिटवाळा, बदलापूर, वसई विरार येथे वास्तव्यास होते. या कर्मचाऱ्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करत अनेक दिव्य पार करत कार्यालये गाठावी लागतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे लक्षात घेऊन म्हाडाने या कर्मचाऱ्यांना मुंबईत १६४ घरे दिली आहेत. त्यामुळे म्हाडाच्या या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.
म्हाडाच्या मुंबईस्थित मुख्यालयात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी म्हाडातर्फे घाटकोपर, मुंबई सेंट्रल व सायनच्या प्रतीक्षानगर येथे १६४ सेवा निवासस्थानांचे वाटप करण्याचा निर्णय उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतला. यामुळे सेवानिवासस्थानासाठीची प्रतीक्षा यादी आता शून्यावर आली आहे.
म्हाडामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे मुंबईत सेवा निवासस्थान मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. २०२२ मध्ये सरळसेवा भरतीतून नियुक्त कर्मचाऱ्यांची भर पडल्यामुळे सेवानिवासस्थानासाठी ३८७ कर्मचारी प्रतीक्षा यादीवर होते.
१६४ पैकी ८० घरे घाटकोपर येथे, ५७ घरे मुंबई सेंट्रल येथे व २७ घरे प्रतीक्षानगर येथे आहेत. म्हाडाच्या विविध विभागीय मंडळांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी मुंबईमध्ये बदली होऊन नियुक्त होतात. तसेच सरळ सेवा भरतीतही कर्मचाऱ्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली आहे. - अनिल वानखडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा.