लॉटरी आम्हीच काढतो! पूर्ण ओसी नसताना घाई कशासाठी करता? पत्राचाळीतील रहिवाशांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:34 IST2025-02-15T16:33:43+5:302025-02-15T16:34:13+5:30

पत्राचाळीची जमीन बळकाविण्यापासून आम्ही वाचविली. आम्ही येथे झोपड्या बांधल्या असत्या. आम्ही दोन दशकांहून अधिक काळ नरकयातना भोगल्या.

MHADA Completes 672 Flats Under Patra Chawl Redevelopment Project In Goregaon's Siddharth Nagar | लॉटरी आम्हीच काढतो! पूर्ण ओसी नसताना घाई कशासाठी करता? पत्राचाळीतील रहिवाशांची घोषणाबाजी

लॉटरी आम्हीच काढतो! पूर्ण ओसी नसताना घाई कशासाठी करता? पत्राचाळीतील रहिवाशांची घोषणाबाजी

मुंबई

पत्राचाळीची जमीन बळकाविण्यापासून आम्ही वाचविली. आम्ही येथे झोपड्या बांधल्या असत्या. आम्ही दोन दशकांहून अधिक काळ नरकयातना भोगल्या. तेव्हा आम्हाला कोणी दयामाया दाखवली नाही. आम्हीला ४० हजार रुपये भाडे मिळत होते. ते २५ हजारांवर आणून ठेवले. आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर म्हाडा फायदे सांगत लॉटरी काढत आहे. मात्र, ६७२ घरांची लॉटरी आम्हाला काढू द्या, असा पवित्रा घेत पत्राचाळीच्या रहिवाशांनी म्हाडाविरोधात घोषणाबाजी केली. 

गोरेगावमधील पत्राचाळीच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रसार माध्यमांच्या शुक्रवारच्या पाहणी दौऱ्यावेळी प्रकल्पस्थळी रहिवासी आक्रमक झाले. म्हाडा मनमानी कारभार करत आहे, असा दावा करत त्यांनी घोषणाबाजी केली. आता प्रकल्प पूर्ण झाल्यावर लॉटरी काढण्याची घाई करत आहेत. प्रकल्पाच्या आसपास सगळे रस्ते काँक्रीटचे आहेत. मग प्रकल्पाच्या बाजूलाच डांबराचे रस्ते का, प्रकल्पाला अर्धवट ओसी मिळाली आहे. पूर्ण ओसी नसताना म्हाडा लॉटरीची घाई का करत आहे, असा प्रश्न रहिवाशांनी विचारला. 

२००८ पासून घरे केली रिकामी
१७ वर्षांपासून अधिक काळ आम्ही या जागेसाठी लढा देत आहोत. म्हाडाने कधी आम्हाला विचारले नाही. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. असा आरोप पत्राचाळीतील रहिवाशांनी केला. 

गेल्या दोन दशकांमध्ये अनेक रहिवाशांचे निधन झाले. अनेक कुटुंब इतरत्र स्थलांतरित झाली. म्हाडाने कधीही आमचा विचार केला नाही. एवढी वर्षे आमचा तोटा झाला. तेव्हा म्हाडा कुठे होते. म्हाडा कोणाला विचारुन लॉटरी काढत आहे. तो अधिकार सोसायटीला द्यावा.

- सिद्धार्थ नगर गृहनिर्माण सोसायटी (पत्राचाळ)

पत्राचाळीतील रहिवाशांना ६५० चौरस फुटांचे घर
१. दोन दशकांहून अधिक काळ घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या रहिवाशांना म्हाडाने लॉटरीची गोड बातमी दिली आहे. २६ फेब्रुवारीला लॉटरी काढण्यात येणार असून ६५० चौरस फुटांचे घर रहिवाशांना मोफत मिळणार आहे. 

२. गेल्या अनेक वर्षांपासून पत्राचाळीचाय गृहनिर्माण प्रकल्प वादात सापडला होता. म्हाडा, बिल्डर आणि सोसायटीमध्ये करार होऊनही बिल्डरमुळे प्रकल्पांना विलंब होत होता.

३. म्हाडाने २०२२ मध्ये हा प्रकल्प ताब्यात घेतला. इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी रेलकॉन कंत्राटदाराची नियुक्त करत सुमारे २२० कोटी रुपये दिले. हा प्रकल्प पूर्ण झाला असून लवकरच रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. 

रहिवाशांच्या मागण्या अशा...
२५ कोटी कॉर्पस फंड त्रिपक्षीय करारनामा २००८ प्रमाणे व्याजासहि द्यावा. त्रिपक्षीय कराराप्रमाणे १५ टक्के आर जी प्लॉट संस्थेला देणे. म्हाडाने लॉटरी पूर्वी त्रिपक्षीय कराराला अधीन राहून संस्थेशी करारनामा करावा. 
पार्किंगच्या जागेत म्हाडा ७२ व्यावसायिक गाळे बांधत आहे ते थांबवावे. 

रस्ता, पाणी जोडणी नाही
प्रकल्पाला रस्ता नाही, पाणी नाही, गॅसपाइप लाइन नाही, कितीतरी विंगचे फिटआउट झालेले नाही. बेसमेंट व पोडिअममधील कामे बाकी आहेत.

Web Title: MHADA Completes 672 Flats Under Patra Chawl Redevelopment Project In Goregaon's Siddharth Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.