मेट्रो सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशी हाल, अंधेरी-दहिसर मार्गावर बिघाडामुळे दोन तास सेवा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:03 IST2025-12-08T09:01:02+5:302025-12-08T09:03:34+5:30
सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

मेट्रो सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशी हाल, अंधेरी-दहिसर मार्गावर बिघाडामुळे दोन तास सेवा विस्कळीत
मुंबई : अंधेरी पश्चिम ते दहिसर ‘मेट्रो २ अ’ आणि (गुंदवली - दहिसर) ‘मेट्रो ७’ या मार्गिकांवर तांत्रिक अडचणींमुळे मेट्रोसेवा रविवारी तब्बल दोन तासांहून अधिक कालावधीसाठी विस्कळीत झाली. सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
महामुंबई मेट्रो रेल संचालन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) चालविण्यात येणाऱ्या या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. अनेक गाड्या एकाच जागी थांबून राहिल्या. त्यामुळे प्रवासी एक तास एकाच जागी अडकून पडले, तर हजारो प्रवासी गाडीची प्रतीक्षा करत स्थानकांवर थांबून होते. गाड्या सुरू झाल्या, तरी त्या अतिशय धिम्या गतीने चालविल्या जात होत्या. यातच लग्न आणि अन्य समारंभासाठी मेट्रोने अनेक जण गेले होते, तसेच सुट्टी असल्याने सायंकाळी नातलग, मित्र-मैत्रिणींच्या भेटीसाठी, तसेच कुटुंबीयांसोबत बाहेर फिरण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना यामुळे जाच सहन करावा लागला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ गाडी येत नाही, हे पाहून तिकीट असतानाही अनेकांनी स्थानकातून बाहेर पडून पर्यायांनी इच्छितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला.
मेट्रोसेवा विस्कळीत झाल्यानंतर एमएमएमओसीएलने काही स्थानकांची काही प्रवेशद्वारे बंद केल्याचे प्रवाशांनी समाजमाध्यमातून सांगितले, तर मितेश भट या प्रवाशाने ट्विट करत, एक तासाहून अधिक काळ गुंदवली मेट्रो स्थानकावर उभा आहे. मेट्रो गाडी आली नाही, तसेच योग्य माहितीही दिली जात नाही, असे स्पष्ट केले.
आधीच गाड्यांची वारंवारता कमी...
रविवारी गाड्या १५ मिनिटांच्या वारंवारतेने चालविल्या जातात. आधीच गाड्या कमी संख्येने असताना, त्यात बिघाड झाल्याने सेवा सुरू झाल्यानंतरही दोन गाड्यांतील अंतर वाढले होते. मेट्रोसेवा रात्री उशिरापर्यंत रुळावर आली नव्हती. याबाबत नक्की बिघाड कशामुळे झाला, याची कोणतीही माहिती एमएमएमओसीएलने दिली नाही, तसेच यापूर्वी या मेट्रो मार्गिकेवर बिघाडाचे प्रकार घडून प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागले होते.
सिग्नल यंत्रणेशिवाय अनेक गाड्या चालविण्याची ओढवली वेळ
सिग्नल यंत्रणेत सातत्याने बिघाड येत असल्याने सेवा विस्कळीत होत होती. त्यामुळे सिग्नल यंत्रणेविना ऑपरेटरने नियंत्रण कक्षाच्या मार्गदर्शनाने गाड्या चालविल्या. त्यातून सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास सेवा काहीशी सुरू झाली. मात्र, गाड्या अतिशय धिम्या गतीने चालविल्या जात होत्या, अशी माहिती एमएमएमओसीएल अधिकाऱ्यांनी दिली. या गाड्या १० ते १५ किमी प्रतितास वेगाने गाड्या चालविल्या जात असल्याचे प्रवाशांनी नमूद केले. त्यातून मेट्रोचा प्रवासही विलंबाचा झाला होता.