Join us  

मुंबईकरांसाठी मेट्रो-६ मार्गिका ठरणार वरदान, २०२१ मध्ये होणार कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 3:34 AM

समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे.

- योगेश जंगममुंबई - समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे.समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका १५ किलोमीटर लांब प्रस्तावित आहे. या मार्गिकेच्या कामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली असून या संपूर्ण मार्गावर बॅरिकेटिंगचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-६ ही मार्गिका दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर ही मेट्रो २ अ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो-७, कुलाबा-वांद्रे-सीप्झ ही मेट्रो-३ आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे ही मेट्रो-४ अशा प्रस्तावित असलेल्या चार मेट्रो प्रकल्पांना छेदणार आहे. यासह पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी स्थानक आणि पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक या दोन रेल्वे स्थानकांना मेट्रो-६ मार्गिका जोडणार असल्याने मुंबईकरांना या ठिकाणी गाडी बदलता येणार आहे. यामुळे आपल्या इच्छित स्थळी जाण्यास कमी अवधी आणि कमी अंतर कापावे लागणार असल्याने त्यांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे.मेट्रो-६ या मार्गिकेवर एकूण १३ मेट्रो स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुफा, सीप्झ गाव, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आय आय टी पवई, कांजूर मार्ग, विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग अशी स्थानके असणार आहेत. यामध्ये इन्फिनिटी मॉलजवळ मेट्रो-६ मार्गिका मेट्रो-२ अ या मेट्रो मार्गिकेला जोडणार आहे, तर जेव्हीएलआर या ठिकाणी मेट्रो-७, सीप्झ येथे मेट्रो-३, तर कांजूरमार्ग या ठिकाणी मेट्रो-४ या मार्गिकेला जोडणार आहे. यामुळे प्रवाशांना जलद गतीने मार्ग बदलून आपल्या इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे. तसेच मेट्रो-६ मार्गिका जोगेश्वरी आणि कांजूरमार्ग या पश्चिम आणि पूर्व स्थानकांना जोडणार असल्याने पूर्व उपनगर विक्रोळी ते जोगेश्वरीदरम्यान प्रवासामध्ये ४५मिनिटांची बचत होणार आहे.मेट्रो-६ या प्रकल्पासाठी ५ हजार ४९० कोटींचा खर्च येणार आहे. २०२१ पर्यंत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानुसार आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मेट्रो-६ मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरादरम्यान प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर बॅरिकेटिंगचे काम पूर्ण करून आता सिव्हिल वर्क करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहेत.अशी असतील स्थानकेस्वामी समर्थनगर, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुफा, सीप्झ गाव, साकी विहार रोड, राम बाग, पवई तलाव, आय आय टी पवई, कांजूर मार्ग, विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग.मेट्रो-६ हा प्रकल्प वेळापत्रकाप्रमाणे वेळेमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मेट्रो-६ ही मार्गिका चार मेट्रो आणि पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी आणि पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग या स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता येईल.- दिलीप कवठकर, सह प्रकल्प संचालक, एमएमआरडीए

टॅग्स :मेट्रोमुंबई