मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 06:41 IST2020-09-11T01:48:16+5:302020-09-11T06:41:48+5:30
कोच येत्या काही दिवसांत येणार डेपोत

मे महिन्यात मेट्रो-२ अ, मेट्रो-७ धावणार; जानेवारीत होणार ट्रायल
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सुरू असलेली मेट्रोची कामे वेगाने होत असून, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ मार्गावरील मेट्रो रेल्वेच्या ट्रायल जानेवारी महिन्यात सुरू होणार आहेत. विशेषत: या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो रेल्वे कोच येत्या काही दिवसांत चारकोप डेपोत दाखल होणार असून, जानेवारी महिन्यातील मेट्रो रेल्वेच्या ट्रायलनंतर प्रत्यक्षात मे महिन्यात या दोन्ही मार्गांवरील मेट्रो प्रवाशांना घेऊन धावणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी गुरुवारी मेट्रो २-अ आणि मेट्रो-७ च्या कामाबाबत प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. यावेळी राजीव यांनी कोरोना काळात आलेल्या अडचणींसह मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ च्या कामाचा आढावा घेतला.
आर.ए. राजीव यांनी सांगितले की, मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा विचार होता. मात्र कोरोनासारख्या असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. आता या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७चे काम वेगाने सुरू आहे. ११ डिसेंबर रोजी मेट्रो कोचचे ३ सेट मुंबईत दाखल होणार आहेत. चारकोपमध्ये हे मेट्रो कोच दाखल होतील. एप्रिलमध्ये १० ट्रेन येतील. ट्रायल सुरू करण्यासाठी काही वेळ लागतो. १४ जानेवारीच्या आसपास आपण मेट्रोच्या ट्रायल सुरू करू.
मे महिन्यात या दोन्ही मेट्रो सुरू होतील, असा विश्वास आहे. दहा मेट्रो सुरू करतानाच दोन मेट्रोमध्ये अर्ध्या तासाचे अंतर असेल. कालांतराने मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार केला जाईल. सर्व योजना पूर्ण झाल्या आहेत. कोरोनामुळे काही अडचणी आल्या. कामगार कमी झाले. मात्र आम्ही अडचणींवर मात केली.
मेट्रो अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज आहे. मेट्रोमध्ये सुरुवातीला आपण ड्रायव्हरची मदत घेणार आहोत. मात्र मेट्रो ही ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजी आहे. भविष्यात आपणाला ड्रायव्हरची गरज भासणार नाही.