लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईमेट्रो मार्ग ११ प्रकल्पासाठी ५५०० कोटी रुपयांचे जपानी अधिकृत विकास सहाय्य (ओडीए) कर्ज देण्यासाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) भारत सरकारसोबत कर्ज करारावर स्वाक्षरी केल्या. या प्रकल्पात १४ स्थानकांसह अंदाजे १७.५१ किमी मेट्रो मार्गांचा समावेश आहे. त्यातून मुंबई पोर्ट वॉटरफ्रंट आणि मुंबईला जोडणारा मार्ग तयार करून मुंबई ट्रान्सहार्बर लिंकपर्यंत (एमटीएचएल) त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे.
मेट्रो ११ प्रकल्पासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) काम करेल. हा प्रकल्प ऑगस्ट २०३२ पर्यंत पूर्ण होणार आहे. भूमिगत विभागांतील बांधकामाची प्रारंभिक खरेदी पॅकेजसाठीच्या निविदेची घोषणा सप्टेंबर २०२६ मध्ये होईल. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती वाहतुकीची मागणी मोठ्या प्रमाणात जलद वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करून पूर्ण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. शहरी वातावरणात सुधारणा होईल आणि वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
दक्षिण मुंबईतील कोंडी फुटणार!
मेट्रो ११ (ग्रीन लाईन) ही दक्षिण मुंबईतील कोंडी कमी करण्यासाठी आखलेली, भूमिगत असलेली सुमारे १७–१८ कि.मी. लांबीची मार्गिका आहे. ही मार्गिका वडाळा (आणिक डेपो) ते गेटवे ऑफ इंडिया यांना जोडणार आहे.
वांद्रे टर्मिनसपर्यंत हाेणार विस्तार
मेट्रो ११ (ग्रीन लाईन) प्रकल्पाचा अंदाजित खर्च २३,४८७ कोटी असून, बांधकाम २०२७ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेत एकूण १४ स्थानके असतील, त्यापैकी १३ भूमिगत असतील. माहितीनुसार, ही मार्गिका वांद्रे टर्मिनसपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव आहे.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव डॉ. आलोक तिवारी आणि जेआयसीए इंडिया कार्यालयाचे मुख्य प्रतिनिधी टेकुची ताकुरो यांनी नवी दिल्लीत या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
मार्ग - मूळ योजना आणिक डेपो (वडाळा) ते गेटवे ऑफ इंडिया
विस्तार (प्रस्तावित) - धारावीमार्गे वांद्रे टर्मिनसपर्यंत ६.९ किमी वाढ, ज्यात ५ नवीन स्थानके प्रस्तावित
Web Summary : Japan provides ₹5500 crore loan for Mumbai's Metro-11 project, spanning 17.51 km with 14 stations. It will connect Mumbai Port to the Mumbai Trans Harbour Link, easing traffic congestion in South Mumbai. Completion is expected by 2032, with potential extension to Bandra Terminus.
Web Summary : जापान ने मुंबई की मेट्रो-11 परियोजना के लिए ₹5500 करोड़ का ऋण दिया, जिसमें 14 स्टेशनों के साथ 17.51 किमी शामिल है। यह मुंबई पोर्ट को मुंबई ट्रांस हार्बर लिंक से जोड़ेगा, जिससे दक्षिण मुंबई में यातायात कम होगा। 2032 तक पूरा होने की उम्मीद, बांद्रा टर्मिनस तक विस्तार संभव।