Join us

आता अंधेरी ते घाटकोपरदरम्यान धावणार मेट्रो १ च्या फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:34 IST

या मार्गावर सध्याच्या क्षमतेपेक्षा दरताशी ५ हजार अधिक प्रवासी प्रवास करू शकतील

मुंबई :मेट्रो १ मार्गिकेवर आता वर्सोवा ते घाटकोपर या संपूर्ण मार्गाबरोबरच घाटकोपर ते अंधेरी या कमी अंतरासाठीही मेट्रो गाडी चालविण्याच्या हालचाली मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) सुरू केल्या आहेत. त्यातून या मार्गावर सध्याच्या क्षमतेपेक्षा दरताशी ५ हजार अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मेट्रो १ मार्गिकेची सार्वजनिक खासगी-भागीदारी पद्धतीने बांधा-वापरा-स्वामित्व घ्या आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर उभारणी केली आहे. ही मेट्रो मार्गिका ११.४ किमी लांबीची असून, त्यावर १२ स्थानके आहेत. सद्य:स्थितीत ही गाडी ४ डब्यांची आहे. या मेट्रो मार्गिकेवर कार्यालयीन दिवसात ५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून कार्यालयीन वेळेत या मेट्रो मार्गिकेवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. भविष्यात प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्यावेळी अधिकाधिक प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचविण्याच्या अनुषंगाने उपाययोजना आखण्यास एमएमओपीएलने सुरुवात केली आहे. त्यानुसार घाटकोपर ते अंधेरी मार्गावर कमी अंतरासाठी मेट्रो गाडीच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत या मार्गिकेवर ८८ टक्के प्रवासी हे केवळ घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. त्यातून कमी अंतराच्या मार्गावर अधिक फेऱ्या चालविण्याचा विचार आहे.

काय बदल करणार ?

 सध्या घाटकोपर येथून निघालेली मेट्रो ही शेवटचे स्थानक असलेल्या वर्सोव्यापर्यंत जाते. तिथून फिरून ही मेट्रो पुन्हा घाटकोपरला जाते. त्याऐवजी नव्या बदलात प्रवासी संख्या अधिक असलेल्या घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर काही अतिरिक्त गाड्या चालविल्या जातील.

ही गाडी घाटकोपर स्थानकातून सुटल्यावर अंधेरीपर्यंत जाईल, तिथून ती पुन्हा घाटकोपरला माघारी येईल. दोनपैकी एक गाडी अंधेरीपर्यंतच धावेल, तर दुसरी गाडी वर्सोव्यापर्यंत जाईल. गर्दीच्यावेळी दोन तासांसाठी हा बदल केला जाईल, असे एमएमओपीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आठ टक्के क्षमता वाढणार 

हे बदल अस्तित्वात आल्यावर दोन गाड्यांतील सध्याचे अंतर २२० सेंकदांवरून २०५ सेकंदांवर येईल. त्यातून गाड्यांच्या फेऱ्या वाढून या मार्गावर प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ८ टक्क्यांनी वाढेल. 

टॅग्स :मुंबईमेट्रो