मुंबई : मुंबईत ६२.४ टक्के अतिरिक्त पाऊस पडला असून, नैर्ऋत्य मान्सूनने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पावसाने जून, जुलै आणि सप्टेंबरच्या सरासरीला सहज पार केले आहे. तर आॅगस्ट महिन्यात पाऊस बरोबरीत राहिला आहे. मात्र यंदा पावसाने काही ठिकाणी रौद्ररूप धारण करणाऱ्या अतिवृष्टीला हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ जबाबदार असल्याचे म्हणणे आता पर्यावरणवाद्यांसह हवामान अभ्यासकांनी वारंवार मांडले आहे."स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत मान्सूनच्या हंगामात सर्वाधिक वेळेस तीन अंकी पाऊस होण्याची नोंद या वर्षी झाली आहे. एवढा मोठा पाऊस होण्यास जागतिक तापमानवाढ, हवामान बदल कारणीभूत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पावसासाठी हवामानतज्ज्ञांनी जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलास जबाबदार धरले आहे. केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण जगच या घटनांमुळे होरपळत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मोठ्या प्रमाणावर बदलत चाललेल्या या वातावरणाचा परिणाम अतिवृष्टी तसेच विविध रुपात अनुभवायला मिळत आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत जवळपास १० वेळेस तीन अंकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी चार वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला. २ जुलै रोजी मुंबईत ३७५.२ मिमी एवढ्या जोरदार पावसाची नोंद झाली.
‘जागतिक तापमानवाढी’मुळे झाल्या अतिवृष्टीच्या नोंदी, हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:14 IST