महामुंबईवर धुक्याची चादर; मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा २ अंशाने खालावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 06:35 IST2024-12-22T06:35:29+5:302024-12-22T06:35:38+5:30

धुक्यासह धुळीमुळे कोंडतोय नवी मुंबईकरांचा श्वास

mercury in Konkan including Mumbai dropped by 2 degrees below average | महामुंबईवर धुक्याची चादर; मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा २ अंशाने खालावला

महामुंबईवर धुक्याची चादर; मुंबईसह कोकणातील पारा सरासरीपेक्षा २ अंशाने खालावला

मुंबई : मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात २४ डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवणार आहे, तर मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान १९ अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे.

२५ ते २९ डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात, भाग बदलत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. २६ ते २८ डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे दरवर्षी नाताळला जाणवणारी तीव्र थंडी ढगाळ वातावरणामुळे अनुभवता येणार नाही. ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

धुक्यामुळे लोकलला १५ मिनिटे लेटमार्क 
डोंबिवली : कर्जत-कसारा रेल्वेमार्गावरील वाहतूक धुक्यामुळे १५ मिनिटे विलंबाने सुरू होती. कर्जत, नेरळ, बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणि कसारा मार्गावर आसनगाव, खर्डी, टिटवाळा स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत धुके असल्याने गाड्या विलंबाने धावल्या. दुपारी १२:३० नंतर वातावरण स्वच्छ झाल्यानंतर लोकल सेवा रुळावर आली.

रायगडमध्ये वाहतूक मंदावली 
नागोठणे : पहाटेची गुलाबी थंडी अन् दाट धुके असे वातावरण रायगड जिल्ह्यात सर्वत्र आहे. शनिवारी पहाटे तर पाच-दहा फुटांवरील घरे, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. या दाट धुक्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील मुख्य व अंतर्गत मार्गावरील वाहतूक सकाळच्या वेळी मंदावली होती. मॉर्निंग वॉक किंवा व्यायामासाठी घराबाहेर पडणारी मंडळीही धुक्याचा मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळते.

अंबरनाथ-बदलापूरची वाट धुक्यात 
बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ, बदलापूरमधील ग्रामीण पट्ट्यात थंडीचा जोर वाढल्याने सर्वत्र धुके पसरले होते. वांगणी परिसरात दाट धुक्यामुळे दृश्यमानतेत कमालीची घट झाली. १० फुटांवरील रस्ताही दिसेनासा झाला. त्यामुळे चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागली. दाट धुक्यामुळे कल्याण-कर्जत महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.

धुक्यासह धुळीमुळे कोंडतोय नवी मुंबईकरांचा श्वास

नवी मुंबई : थंडी सुरू झाल्यापासून नवी मुंबईला रोज सकाळी धुक्यासह धूर, धुळीचे आच्छादन तयार होऊ लागले आहे. औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यांमधील धूर, रस्त्यांवरील धूळ हवेत मिसळू लागले आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोज सकाळी शहर धुक्यात हरवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शनिवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १३८ एवढा होता. या निर्देशांकामधील हवा फुप्फुसे, दमा व हृदयाचा त्रास असलेल्यांसाठी घातक असते.
 

Web Title: mercury in Konkan including Mumbai dropped by 2 degrees below average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.