Mumbai Crime:मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका २४ वर्षीय दंतवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्तुती सोनावणे असे या तरुणीचे नाव असून, तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ६ पानांच्या सुसाईड नोटमध्ये आपल्या प्रियकराकडून होणाऱ्या मानसिक छळाचा पाढा वाचला आहे. या चिठ्ठीतील धक्कादायक खुलाशांमुळे पोलीस प्रशासनही हादरून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्तुती नवी मुंबईतील एका नामांकित डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती आपल्या आई-वडील आणि बहिणीसह अँटॉप हिलमध्ये राहत होती. तिचे मोहम्मद फौझील नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असताना काही काळाने फौझील तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. सुसाईड नोटनुसार, फौझील तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ आरोप करायचा, ज्यामुळे स्तुती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
"तू फ्रिजमध्ये सापडशील..." मित्रमैत्रिणींच्या टोमण्याने खचली
या सुसाईड नोटमधील सर्वात अंगावर शहारे आणणारा भाग म्हणजे दिल्लीतील गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा संदर्भ. स्तुतीच्या सुसाईड नोटमध्ये तिने नमूद केले आहे की, तिचे मित्र-मैत्रिणी तिला अनेकदा मस्करीत टोमणे मारायचे. "एके दिवशी तू सुद्धा आम्हाला फ्रिजमध्येच सापडशील," असे विधान तिला वारंवार ऐकावे लागत होते. स्वतःच्या जवळच्या व्यक्तींकडून मिळणाऱ्या अशा प्रतिक्रियांनी आणि प्रियकराच्या संशयास्पद वागण्याने तिला आपल्याच नात्यात असुरक्षित वाटू लागले होते.
मंगळवारी सकाळी उघड झाले क्रूर सत्य
नेहमीप्रमाणे स्तुती आपल्या खोलीत होती. मात्र, मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ती बाहेर न आल्याने कुटुंबीयांना शंका आली. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी वारंवार आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, स्तुती नायलॉनच्या ओढणीने छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलीस तपास आणि पुढील कारवाई
पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून जप्त केलेली ६ पानांची सुसाईड नोट हा या तपासातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. पोलिसांनी आता मोहम्मद फौझीलची भूमिका आणि त्याच्याकडून झालेला छळ या दिशेने तपास सुरू केला असून, कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. उच्चशिक्षित तरुणीने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने समाजातील टॉक्सिक रिलेशनशिप आणि तरुणांमधील मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Web Summary : Mumbai dentist, Stuti Sonawane, committed suicide after alleged harassment by her boyfriend and taunts referencing the Shraddha Walkar case. A suicide note revealed the mental torture. Police are investigating.
Web Summary : मुंबई में डेंटिस्ट स्तुति सोनवणे ने कथित तौर पर अपने बॉयफ्रेंड द्वारा उत्पीड़न और श्रद्धा वालकर मामले के संदर्भ में दिए गए तानों के बाद आत्महत्या कर ली। एक सुसाइड नोट में मानसिक यातना का खुलासा हुआ। पुलिस जांच कर रही है।