Join us

लाडकी बहीण योजनेत पुरुषांची घुसखोरी; महसूलमंत्री म्हणाले, गुन्हेच दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:11 IST

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या योजनेचा लाभ घेणारे पुरुष तर दोषी आहेतच, पण सरकारी यंत्रणा काय करत होती, हा प्रश्न आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाभ उचलल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात दिल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. महिलांसाठीच्या योजनेमध्ये अशी घुसखोरी करणारे पुरुष आणि त्यांना योजनेचा लाभ देणारे अधिकारी यांच्याबद्दल सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

१४ हजारांवर पुरुष या योजनेचा लाभ घेतात, सरकार त्यांना २१ कोटी ४४ लाख रुपये थेट बँक खात्यात अदा करते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वृत्ताची दखल घेतली. लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असतील, तर अशा पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, पैसेही त्यांच्याकडून  वसूल करावेत, असे बावनकुळे ‘एक्स’वर म्हणाले. 

यंत्रणा काय करते? वडेट्टीवारांचा सवाल

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या योजनेचा लाभ घेणारे पुरुष तर दोषी आहेतच, पण सरकारी यंत्रणा काय करत होती, हा प्रश्न आहे. १४ हजारांवर पुरुष केवळ महिलांसाठी असलेल्या योजनेत घुसखोरी करतात आणि प्रशासन एकालाही रोखत नाही, उलट १० महिने बँक खात्यात पैसे टाकले जातात. सक्रिय झालेले दलाल आणि अधिकारी यांचे संगनमत होते, हे स्पष्ट आहे.

 

टॅग्स :लाडकी बहीण योजनाचंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळे