Join us  

एक आठवण... डिजिटल फ्लेक्समधून नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 4:12 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून आला.

ठळक मुद्देराणे विरुद्ध शिवसेना हा शाब्दीक वाद सुरूच आहे. राणेनंतर आता राणेपुत्र नितेश राणेंनीही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून अटक झाली होती. या अटकेदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी राणेंविरोधात निदर्शनं झाली. मुंबईतील राणेंच्या घराबाहेरही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या अटक नाट्यामुळे स्थगित झालेली भाजपाची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारी पुन्हा रत्नागिरीतून सुरू झाली आहे. मात्र, राणे विरुद्ध शिवसेना हा शाब्दीक वाद सुरूच आहे. राणेनंतर आता राणेपुत्र नितेश राणेंनीही फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना एकवटल्याचे पाहायला मिळाले. तर भाजपा नारायण राणेंच्या मागे ठामपणे उभा राहिलेला दिसून आला. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. नारायण राणेंना अटक झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली. मात्र, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा एकदा राणे जनआशीर्वीदासाठी आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तापलेलं राजकीय वातावरण अद्यापही शमल्याचं दिसत नाही. राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हिरक महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी महोत्सव... हे सांगणारा डिजिटल फलक ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचलं आहे. यापूर्वी नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना 75 व्या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसल्याचे सांगत टीका केली. 

काय म्हणाले होते राणे

रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्रा पोहोचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना, मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य राणेंनी केलं होतं. त्यानंतर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून नारायण राणेंविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. 

जनआशीर्वीद यात्रेला पुन्हा सुरुवात 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज पुन्हा भाजपाची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनानीतेश राणे नारायण राणे