मुंबई - एका व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या श्वानाला मित्राचे नाव लावत तो सोशल मीडियावर व्हायरल करणे दुबईतील तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याने हा प्रकार २०२४ मध्ये केला. मात्र, तो ईदसाठी देशात परतल्यानंतर त्याच्या मित्रांनी गोरेगावमध्ये त्याच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पीडित नौमन नूर मोहम्मद ठाकूर (२५) हा २०२१ पासून दुबईमध्ये नोकरी करत आहे. तसेच गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगर-२ येथे त्याचे कुटुंब राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित रीलमध्ये एक कुत्रा गावकऱ्यांसोबत नाचत होता, ज्याला ठाकूर याने आरोपी वसीम शेख, इम्रान, तन्वीर खान आणि फारुख खान यांची नावे टॅग केली होते. हे सर्व आरोपी तक्रारदार राहात असलेल्याच विभागात राहतात. ठाकूरच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी ईद साजरी करण्यासाठी तो त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत परतला होता. त्यावेळी हल्ल्याचा हा प्रकार घडला.
महागडे घड्याळही चोरलेईदच्या निमित्ताने मी माझ्या मित्रासोबत त्या परिसरात होतो, तेव्हा फारुख आणि त्याचे तीन मित्र घटनास्थळी आले. तसेच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या मीमवरून शिवीगाळ करू लागले. त्यांनी धारदार शस्त्रांनी हल्लाही केला. या हल्ल्यानंतर स्थानिकांनी तातडीने ठाकूरला रुग्णालयात नेले. मीम शेअर करताना माझा हेतू कोणाचाही अपमान करणे किंवा त्यांची चेष्टा करणे हा नव्हता. मात्र, हल्ल्यात आरोपींनी त्याचे महागडे घड्याळ चोरले, असेही त्याचे म्हणणे आहे. गोरेगाव पोलिसांनी यातील वसीमला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.