Join us  

चार ज्येष्ठांना डावलून मेहता यांची वर्णी!, तीन महिन्यात तीन मुख्य सचिव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:18 AM

सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेल्या चार अधिकाऱ्यांना डावलून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेल्या चार अधिकाऱ्यांना डावलून मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागली आहे. मेहता यांचे दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असणारी जवळीक यासाठी कामी आली असल्याची चर्चा आहे. राज्याला तीन महिन्यात तीन मुख्य सचिव मिळण्याची ५० वर्षांतली ही पहिली घटना आहे.सेवा ज्येष्ठतेत सर्वात पहिले नाव मेधा गाडगीळ यांचे होते. त्या आॅगस्ट २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांना आधी महाराष्टÑ राज्य वित्तीय महामंडळावर नेमले गेले. मात्र एका ज्येष्ठ महिला अधिकाºयास जेथे शिपाई देखील नाही, अशा ठिकाणी नेमणूक दिल्यामुळे अधिकारी वर्तुळात तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर त्यांना महसूलमधून सामान्य प्रशासन विभागातील ‘ओ अ‍ॅन्ड एम’ या विभागात पाठवण्यात आले.सेवा ज्येष्ठतेत गाडगीळ यांच्याहून कनिष्ठ असणाºया डी.के. जैन यांना मुख्य सचिव करण्यात आले होते. जैन जानेवारीमध्ये निवृत्त झाले. त्यांना ६ महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र मार्चमध्ये त्यांची दिल्लीत लोकपाल पॅनलवर नियुक्ती झाली म्हणून मुख्य सचिवपदाचा राजीनामा देऊन ते दिल्लीत गेले. त्याहीवेळी मेधा गाडगीळ यांना डावलण्यात आले.जैन यांच्यानंतर एप्रिलमध्ये युपीएस मदान यांची मुख्य सचिवपदी नेमणूक करण्यात आली. मदान आॅक्टोबर २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र अचानक त्यांच्या जागी मेहता यांची नियुक्ती झाली. मदान यांची नेमणूक राज्य निवडणूक आयुक्त म्हणून केली जाणार असल्याचे समजते. सध्या या पदावर जे.एस. सहारिया आहेत. त्यांची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे. सहारिया यांना एमपीएससी किंवा अन्य ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते.मदान यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेत संजीवनी कुट्टी यांचे नाव येते. सध्या त्या दिल्लीत केंदात सचिव आहेत. मुख्य सचिवपद मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी दिल्लीतच आपला मुक्काम कायम ठेवला. त्या एप्रिल २०२० मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेत अजय भूषण पांडे यांचे नाव होते. पांडे फेब्रुवारी २०२१ मध्ये निवृत्त होणार आहेत. पण त्यांच्याकडे दिल्लीत ‘जीएसटीएन’चे चेअरमन, ‘युआयडीएआय’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महसूल व वित्त विभागात सचिव अशी तीन महत्वाचे विभाग आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च महाराष्टÑात परतण्यास नकार दिला. त्यामुळे अजोय मेहता यांचा मार्ग मोकळा झाला.मेहता हे सप्टेंबर २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. त्याच काळात राज्यात विधानसभेच्या निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना तीन महिने मुदतवाढ दिली जावू शकते.

गेल्या पाच वर्षांत एकही मराठी अधिकारी नाहीमुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ आहेत. मेहता यांच्यानंतर परदेशी यांना मुख्य सचिवपदी नेमले जाईल, असे बोलले जात आहे. कारण कुंटे यांच्या गेल्या दोन वर्षात ज्या गतीने विविध विभागात बदल्या झाल्या ते पहाता त्यांना मुख्य सचिवपद मिळणे अशक्य दिसते. गेल्या पाच वर्षात मुख्य सचिव पदासाठी मराठी अधिकारी मिळू शकला नाही हे ही यानिमित्ताने स्पष्ट झाले.

टॅग्स :महाराष्ट्र सरकारअजोय मेहता