Join us  

भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मेळाव्याकडे मेहता व समर्थकांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 6:38 PM

चंद्रकांत पाटलांनी खरपूस समाचार घेत पालिकेचे तिकीट प्रदेशवरुन मिळणार असल्याचे ठणकावले

मीरारोड - मीरा भाईंदर काकर्यकर्ता मेळाव्याला आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडे भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह त्यांच्या समर्थकांनी सपशेल पाठ फिरवली. तर पाटील यांनी सुद्धा व्यास हे पक्ष चालवण्यास सक्षम असून संपूर्ण भाजपा महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभी आहे . येणाऱ्या महापालिका निवडणुकीचे तिकीट थेट प्रदेश स्तरावरून निश्चित होईल असा इशारा नाव न घेता मेहता व त्यांच्या समर्थकांना दिला . यावेळी त्यांनी विंचूला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो डंखच मारणार अशी गोष्ट सांगत टोला लगावला . 

मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रदेश नेतृत्वाने ऍड रवी व्यास यांची निवड केल्या पासून मेहता व त्यांचे समर्थक पक्ष नेतृत्वा विरुद्ध आक्रमक झाले आहे . प्रदेश कार्यालयावर मेहता समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून देखील पक्षाने दाद दिली नाही . मेहतांना प्रदेश सचिव पद देऊन सुद्धा मेहतांनी ते स्वीकारण्यास नकार दिला . मेहता व समर्थक हे ऍड . व्यास यांना जिल्हाध्यक्ष मानायला तयार नाहीत . शिवाय भाजपा जिल्हा कार्यालय सुद्धा मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातून चालवले जात आहे . त्या आधी भाईंदर पश्चिम येथील जिल्हा कार्यालयचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केले असताना त्याला सुद्धा मेहता व समर्थक जिल्हा कार्यालय मनात नाहीत . 

त्यातच गुरुवारी भाईंदरच्या माहेश्वरी भवन येथे भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड . व्यास यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले असताना सुद्धा मेहतांसह त्यांच्या समर्थकांनी सपशेल पाठ फिरवली . महापौर ज्योत्सना हसनाळे ह्या पाटील यांच्या स्वागताला काशीमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित होत्या . परंतु नंतर मात्र त्या मेळाव्यास आल्या नाहीत . उपमहापौर , स्थायी समिती सभापती, सभागृह नेता तसेच काही अन्य सभापतीं सह अनेक नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षांना महत्व देत नसल्याचा इशाराच पाठ फिरवून दिला. 

प्रदेश कार्यकारिणीच्या कोर कमिटीने रवी व्यास यांना जिल्हाध्यक्ष केले आहे . रवी व्यास पक्ष चालवण्यास सक्षम आहे , महाराष्ट्र प्रदेश पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे. वाद मिटवण्यास भाजपा सक्षम आहे.  भाजप कारवाई पेक्षा सर्वाना प्रेमाने सोबत घेऊन चालतो . रवी काही माझा जावई नाही. त्याने मला वा पक्षाला पैसे दिले नाहीत . तो मेरीटवर जिल्हाध्यक्ष बनला आहे असे पाटील म्हणाले . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर पुन्हा सत्तेत येणार . निवडणुकीत तिकीट मेरिट वर देणार. हा माझा उजवा, डावा म्हणून तिकीट मिळणार नाही. एबी फॉर्म सुद्धा कोरे न देता प्रदेशावरूनच उमेदवाराचे नाव भरून पाठवणार आहोत . महाराष्ट्रात विश्वासघात झाला तसा  इकडे पण सेनेने अपक्ष ला निवडणून आणले व आपल्या त्या ताईंना सेनेत नेले असे पाटील यांनी गीता जैन यांचा नामोल्लेख टाळत सांगितले . 

पाटील यांनी भाषणात पूर्वीचे जिल्हाध्यक्ष म्हणून रोहिदास पाटील , हेमंत म्हात्रे , धनराज अग्रवाल यांची नावे घेतली पण जिल्हाध्यक्ष राहिलेल्या नरेंद्र मेहतांचे नाव मात्र घेतलेच नाही . भाजपा हा कोणाच्या बापाचा,  व्यक्तीचा वा कुटुंबाचा पक्ष नसून तो कार्यकर्त्यांचा मेरिट वर चालणारा पक्ष आहे आहे असे पाटील यांनी सुनावले . 

पाटील यांनी यावेळी साधू आणि विंचूची गोष्ट सांगून मेहतांना एकप्रकारे इशाराच दिला .  एक साधू नदी वर अंघोळ करत असताना एक विंचू बुडताना दिसला म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. विंचूने वाचवणाऱ्या साधूला नांगी मारली असता साधूने कळवळून हात झटकला व विंचू पुन्हा पाण्यात बुडू लागला . साधूने पुन्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा विंचूने डंख मारला . 

अनेक वेळा चाललेला तो प्रकार पाहून एका तरुणाने साधूला विचारणा केली . त्यावर साधू म्हणाला कि , विंचू सुद्धा नांगी मारण्याचा त्याचा गुणधर्म सोडत नसेल तर मी तर माणूस आहे . त्यामुळे माझा वाचवण्याचा हिंदूधर्म कसा सोडू. हे वाक्य रवीने आणि तुम्ही पण लक्षात ठेवा . पाटील यांची गोष्ट म्हणजे , मेहतांना भाजपाने नेहमीच हात देऊन सुद्धा ते डंख मारण्याचे सोडत नाहीत अश्या आशयाची चर्चा रंगली. कोणी काहीही केले तरी प्रेमाने सर्वाना घेऊन काम करा. राजकारणात प्रेमाने काम होते . किंवा काही जण आपल्या शिवाय काम चालते आहे हे पाहून आताच घुसले पाहिजे नाहीतर बाहेर राहून जाऊ ह्या विचाराने काम करतात असा सूचक टोला पाटील यांनी लगावला. 

ऍड . व्यास यांनी भाषणात , कोणा व्यक्तीच्या खाजगी व्यावसायिक कार्यालयात जायचे कि देवेंद्र फडणवीस यांनी उदघाटन केलेल्या भाजपा जिल्हा कार्यालयात जायचे ? असा प्रश्न केला जातोय . भाजपा जिल्हा कार्यालयात जायचे नाही म्हणून कार्यकर्त्यांना धमकावले जाते असे सांगितले . पाटील यांनी, फडणवीस यांनी उदघाटन केलेले जिल्हाध्यक्षांचे जिल्हा कार्यालय हेच अधिकृत जिल्हा कार्यालय असल्याचे सूचित केले आहे . एकूणच येणाऱ्या काळात मीरा भाईंदर भाजपा मध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत .  

टॅग्स :मुंबईमीरा-भाईंदरभाजपा